मुंबई - प्रकृती अस्वास्थ्यामुळं ४१ तासांचा प्रवास करून भारतात येऊ शकत नसल्याचे कारण पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीने पीएमएलए न्यायालयात दिलं आहे. चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या मागणीची याचिका अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) विशेष न्यायालयात दाखल केली होती. त्यावर चोक्सीनं ईडीची याचिका रद्द करण्याची विनंती करत प्रकृती अस्वास्थ्याचं कारण पुढे केलं आहे.
थकीत देणी परत करण्यासंदर्भात पंजाब नॅशनल बँकेशी सतत बोलणी सुरू असून याप्रकरणी समेट करायचा असल्याचे चोक्सीने म्हटले आहे. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी ईडी माझ्यावर आरोप करत असल्याचे म्हणत ईडीची याचिका फेटाळून लावावी, अशी विनंती चोक्सीनं न्यायालयात केली आहे. त्यानं वकील संजय अबॉट आणि राहुल अग्रवाल यांच्यामार्फत विशेष न्या. एम. एस. आझमी यांच्यासमोर सोमवारी बाजू मांडली. ईडीनं चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करावं आणि त्याच्या मालमत्ता जप्त करण्यात याव्यात, अशी मागणी न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली आहे.