नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणी केंद्रीय अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या कोठडीत असलेल्या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना कोर्टाने १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी न देता सीबीआयच्याच कोठडीत ठेवावे असा युक्तीवाद केला होता. मात्र, विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी सिब्बल यांचा हा युक्तीवाद फेटाळून लावत चिदंबरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांनतर कोर्टाने त्यांना यावर तुमचं काय म्हणणं आहे विचारल्यानंतर पी. चिदंबरम यांनी मला भारताच्या अर्थव्यवस्थेची काळजी असल्याचे कोर्टात सांगितले.
तसेच चिदंबरम यांची तिहार तुरुंगात रवानगी झाल्याचे वृत्त कळताच त्याच्या समर्थकांनी कोर्टाबाहेर आंदोलन केले. राऊज अवेन्यू कोर्टाबाहेर चिदंबरम यांच्या समर्थकांनी हातात फलक घेऊन निषेध केला. तसेच चिदंबरम यांच्या वकिलाने कोर्टात अजून एक अर्ज केला आहे. या अर्जात पी. चिदंबरम यांना ईडीला सरेंडर करायचे असल्याचे नमूद करण्यात आलं आहे. या अर्जावर १२ सप्टेंबर रोजी सुनावली होणार आहे.