लखनौ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथं निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. माजी आयपीएसने गोमती नगर येथील त्यांच्या राहत्या घरी बंदुकीतून गोळी झाडली. मृत्यपूर्वी अधिकाऱ्याने सुसाईड नोट लिहिली आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. मी माझी ताकद आणि आरोग्य गमावले आहे असं त्यांनी त्यात म्हटलं.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, 'दिनेश कुमार शर्मा (73) या 1975 बॅचचे आयपीएस अधिकारी यांनी विशाल खांड येथील त्यांच्या घरी स्वत:वर गोळी झाडली. मंगळवारी सकाळी मृतदेह त्यांच्या खोलीत आढळून आला. पोलिसांनी खोलीतून सुसाईड नोटही जप्त केली आहे. माजी आयपीएस शर्मा यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले की, 'मी आत्महत्या करत आहे कारण मला चिंता आणि नैराश्य सहन होत नाही. मी माझी शक्ती आणि आरोग्य गमावत आहे, यासाठी कोणीही जबाबदार नाही. सुसाईड नोट लिहून घेतल्यानंतर त्यांनी आपल्या रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून घेतली. ते रिव्हॉल्व्हरही खोलीतच सापडले आहे. या माजी अधिकाऱ्याचा मृतदेह खुर्चीवर सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
आत्महत्या करणारे अधिकारी डीजी पदावरून निवृत्त झाले
माजी आयपीएस दिनेश कुमार शर्मा यांच्यावर डिप्रेशनवर उपचार सुरू होते. डीजी सिक्युरिटी विनोद कुमार सिंह म्हणाले की, 'सकाळी शर्मा यांच्या खोलीतून मृतदेह सापडला. ते चांगले अधिकारी होते आणि माझे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. ते एक चांगले क्रिकेटर देखील होते आणि आयपीएस क्रिकेट संघाचा भाग असायचे. माजी आयपीएस अधिकारी २०१० मध्ये यूपी पोलिसांच्या डीजी (हाऊसिंग कॉर्पोरेशन) पदावरून निवृत्त झाले आणि ते लखनौमध्ये राहत होते. अतिरिक्त आयुक्त (एसीपी) श्वेता चौधरी यांनी सांगितले की, माजी आयपीएस यांनी ज्या खोलीत आत्महत्या केली ती खोली सील करण्यात आली असून रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे.