नवी दिल्ली : एकीकडे हैदराबादमध्ये डॉक्टरवरील बलात्काराच्या आरोपींचे एन्काऊंटर गाजत होते, तर दुसरीकडे उन्नावमध्ये बलात्कार पिडीतेला न्यायालयात जात असताना पेटवून देण्य़ात आल्याच्या वृत्ताने खळबळ उडविली होती. या पिडीतेचा शुक्रवारी रात्री दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10.40 वाजताच्या सुमारास पीडितेचे निधन झाले. तिला एअरलिफ्ट करत दिल्लीला हलविण्यात आले होते. 90 टक्के भाजलेली असूनही ती शुद्धीत होती. यावेळी तिने तिच्यासोबत असलेल्या भावाला मी वाचणार ना? मला मरायचे नाही, असे अश्रू ढाळत सांगितले होते. जवळपास 40 तास तिने मृत्यूशी झुंज दिली होती.
बलात्कार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपींनी पीडितेला गुरुवारी सुनावणीसाठी जात असताना जिवंत जाळले. यात ती 90 टक्के भाजली होती. त्यानंतर सुरुवातीला तिला उपचारासाठी लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात हलविण्यात आले. सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी रात्री तिने अखेरचा श्वास घेतला.
पीडितेच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की आरोपी जेलमधून सुटून आल्यानंतर त्यांना सतत धमकी देत होता आणि याआधीही त्याने अनेकदा पीडितेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या पीडितेवर मागील वर्षी बलात्कार झाला होता. दोन आरोपींपैकी एका आरोपीला दहा दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. दरम्यान, पीडितेच्या खटल्याची तारीख रायबरेली कोर्टात गुरुवारी होती. त्यासाठी उन्नावमधून रायबरेलीला जात असताना आरोपींनी पीडितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवम, त्याचे वडील रामकिशोर, शुभम, हरिशंकर आणि उमेश बाजपेयी यांना अटक केली आहे.
पिडीतेचे मनोबल खचलेले नव्हते. आरोपींना पेटवून दिल्यानंतरही ती १ किमी चालत गेली होती. आग लावण्यापूर्वी तिला दांड्याने मारहाण करण्यात आली होती. तसेच चाकूने वारही करण्यात आले होते. यानंतर ती जेव्हा चक्कर येऊन खाली कोसळली तेव्हा तिच्यावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले. एवढे होऊनही तिने आजुबाजुच्या लोकांकडे मदत मागितली होती. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आग लागलेल्या अवस्थेतही ही पिडीता १ किमी लांबवर चालत गेली आणि पोलिसांना मदतीची विनवणी केली.
आम्ही तिला ओळखले नाही. तेव्हा तीने नाव सांगितले. यानंतर पोलिसांना फोन करण्यात आला तेव्हा तीनेच फोनवर पोलिसांना मदतीसाठी बोलावले. थोड्याच वेळात पोलिस आले आणि गाडीमध्ये घालून घेऊन गेले, असे तिच्या शेजाऱ्याने सांगितले. मरण्याआधी तिने भावाला सांगितले होते की, गुन्हेगारांना सोडू नको.