मुंबई: अवघ्या सात महिन्यांपूर्वी कंत्राटी तत्त्वावर नोकरीवर रुजू झालेल्या संदेशच्या नातेवाइकाना रडू आवरत नव्हते. आईवडिलांना आता कसे आणि काय सांगू? असा प्रश्न पडल्याने मोठ्या भावालाही दुःख आवरणे कठीण झाले होते.
आर. के. टी. मॅनपाॅवर अँड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गोमाने सात महिन्यापूर्वी रुजू झाला होता. त्याला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दहिसर शाखेत शिपाई म्हणून कंत्राटी तत्त्वावर ठेवले होते. ते तीन भाऊ असून विरारमध्ये मधल्या भावासोबत तो राहत होता.
आई-वडील चिपळूणमध्ये असतात. ‘मला त्यांना आता काय सांगायचे तेच कळत नाही. हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असेल,’ असे शताब्दी रुग्णालयाच्या शवागृहाजवळ भावाचा मृतदेह नेण्यासाठी आलेले मोठे भाऊ सचिन गोमाने सांगत असताना त्यांचे डोळे भरून आले.
...आणि खेळ खल्लासबुधवारी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांच्या सुमारास बँकेचे कामकाज ग्राहकांसाठी बंद करण्याची वेळ असताना सफेद आणि काळा शर्ट घातलेले दोन जण तोंडावर लाल कपडा बांधलेल्या अवस्थेत त्याच्या साथीदारासह पिस्तूल घेऊन बँकेत शिरले. त्यांना बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या आणि विरारच्या मनवेलपाडा रोड येथील रहिवासी असलेल्या संदेश गोमारे (२५) याने पाहिले आणि सगळा प्रकार संशयित वाटल्याने तो उठून उभा राहिला. तेव्हा दुकलीपैकी एकाने त्याच्या छातीवर एक राऊंड फायर केला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. ते पाहून अवघ्या काही सेकंदांतच बँकेच्या कॅशिअरकडून अडीच लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन ३ वाजून २९ मिनिटांनी ते दोघेही पसार झाले. हा सगळा प्रकार अवघ्या अडीच मिनिटांत घडला.
गोळीबाराचा आवाज आला नाहीप्रत्यक्षदर्शी प्रवीण मकवाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते बँकेच्या बाजूला असलेल्या गुरुकुल टॉवरजवळ बसले होते. त्यावेळी दोघांना आम्ही पळताना पाहिले. आधी काही समजले नाही. पण, नंतर गोळीबार झाल्याचे समजले. गोळीबाराचा आवाज आला नाही आणि एकाची हत्या झाल्याचे समजले.
मला चार वाजता संदेशच्या मित्राने फोन करीत बँकेतील गोळीबारात तो जखमी झाल्याचे सांगितले. तेव्हा मी शताब्दी रुग्णालयात धाव घेतली, ज्यात त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. तो आमचा सर्वांत धाकटा भाऊ होता. सोबत असलेले काका आणि अन्य नातेवाइकांनाही अश्रू अनावर झाले. संदेशच्या सहकाऱ्यांनीही त्या ठिकाणी गर्दी केल्याने वातावरण शोकाकुल झाले होते.