राज्य सरकारने नेमलेल्या न्या. चांदीवाल चौकशी आयोगाकडून आज देखील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याची उलटतपासणी करण्यात आली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी ही उलटतपासणी घेतली असून अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना आपण त्यांना कधी भेटलो आहोत याबाबत आपल्याला काहीच आठवत नाही, हे सर्वात महत्वाचे उत्तर सचिन वाझे यांनी दिले.
लोकमत न्यूज१८ वर देण्यात आलेल्या माहिती नुसार, आज जवळपास पावणे एकच्या सुमारास न्या. चांदीवाल चौकशी आयोगाची सुनावणीस सुरुवात झाली. सचिन वाझेला उलट तपासणी करताना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावलं गेलं आणि देशमुख यांच्या वकील अनिता यांनी सचिन वाझेला प्रश्न विचारले. मात्र, सचिन वाझे यांनी उत्तर देण्याआधीच अनिल देशमुख यांच्या दुसऱ्या एका वकिलाने मध्यस्थी करत सचिन वाझे आणि परमबीर सिंग या दोघांची दोन दिवसापूर्वी झालेल्या तासाभराच्या भेटीबाबत प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आलेले वृत्तांकनावर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान स्वतः सचिन वाझे यांनीच या अनिल देशमुख यांच्या वकिलांच्या नाराजीला उत्तर देत मीडियाला पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी घडलं ते त्यांनी लिहिलं असं सांगितलं. तसेच न्या. चांदीवाल चौकशी आयोगाचे वरिष्ठ विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मध्यस्थी करत ही खुली चौकशी आहे. यात सर्वांना काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. जे घडलं ते माध्यमांकडून सांगितलं गेलं आणि ते लिहिलं गेलं असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला.