मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कारवाईमुळे चर्चेत आली आहे. घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखरमुळे जॅकलिन ईडीच्या चौकशी फेऱ्यात अडकली आहे. ईडीने २१५ कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित आरोपपत्रात तिला आरोपी करण्यात आले आहे.
सुकेश आणि जॅकलिन यांची घनिष्ठ मैत्री होती. त्याच्या अनेक गुन्ह्यांची जॅकलिन हिला माहिती होती. वेळोवेळी ती सुकेश याच्यासोबत व्हिडीओ कॉलद्वारेही संपर्कात होती. सुकेशने त्याच्या उद्योजक पत्नीकडून २१५ कोटींची खंडणी उकळल्याचेही प्रकरण पुढे आले होते. याच पैशांतून सुकेश याने जॅकलिन हिला सुमारे १० कोटींच्या भेटवस्तू दिल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले. तसेच सुकेशने या खंडणीच्या पैशांतून आपल्याला भेटवस्तू दिल्या आहेत, याचीदेखील माहिती जॅकलिन हिला होती, असा ठपका ईडीने तिच्यावर ठेवला आहे.
जॅकलिनने मात्र ईडीचे आरोप फेटाळले आहेत. मी माझ्या कष्टाने पैसे कमावले आहेत, असं जॅकलीनने बुधावारी ईडी अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवत म्हटलं आहे. माझ्याकडे जेवढी बचत असून ती वैध असून त्याचा या प्रकरणाशी संबंध नाही. माझ्याकडे जे फिक्स्ड डिपॉजिट आहे ते अनेक वर्षांपासून आहे. ते फिक्स्ड डिपॉजिट जुने आहेत. त्यावेळी मी मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याला ओळखत देखील नव्हते, असंही जॅकलिनने सांगितलं आहे.
आतापर्यंत ३२ गुन्ह्यांची नोंद
सुकेशने जॅकलिनला भेटवस्तू दिल्याचा कबुलीजबाब ईडीच्या चौकशीत दिला होता. यापैकी जॅकलिन हिच्याकडून सात कोटींची संपत्ती (भेटवस्तूंसह) ईडीने प्रीव्हेन्शन ऑफ मनी लॉण्ड्रिंग कायद्यांतर्गत यापूर्वीच जप्त केली आहे. याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा जॅकलिनची चौकशी केली आहे. आतापर्यंत सुकेशवर अनेक राज्यांतील पोलिसांबरोबरच ईडी, सीबीआय तसेच आयकर विभागातर्फे एकूण ३२ गुन्ह्यांची नोंद झाली असून ४ एप्रिलला त्याला ईडीने अटक केली आहे. स्वतःच्या पत्नीकडून २१५ कोटींची खंडणी उकळण्यासोबतच, सुकेशने तो पंतप्रधान कार्यालय, गृह मंत्रालय, विधी मंत्रालयातील मोठा अधिकारी असल्याचे भासवत अनेकांना गंडा घातला आहे.