कर्नाटकचे माजी DGP ओम प्रकाश यांच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. पतीची हत्या करून पत्नी पल्लवीने तिच्या मित्राला व्हिडिओ कॉल केला होता. मी राक्षसाला मारून टाकले असं तिने तिच्या मित्राला सांगितले. सध्या पोलीस ओम प्रकाश यांच्या हत्येचा तपास करत आहेत. पत्नी पल्लवीने चाकू मारण्यापूर्वी पतीच्या चेहऱ्यावर मिरचीची पावडर टाकल्याचेही तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी या हत्या प्रकरणात पत्नी पल्लवीसह मुलगी कृतीला ताब्यात घेतले आहे. ओम प्रकाश यांचा मृतदेह बंगळुरूच्या ३ मजली घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. ओम प्रकाश आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद सुरू होते. या वादात पत्नी पल्लवीने पतीच्या चेहऱ्यावर मिरचीची पावडर फेकली. त्यामुळे ओम प्रकाश यांचे डोळे जळजळायला लागले. ते इकडे तिकडे पळत होते, त्यात पत्नीने त्यांच्यावर चाकूने वार केले. यात पतीचा ओम प्रकाश यांचा मृत्यू झाला.
जमिनीवरून होता वाद
या जोडप्यात कायम भांडणे सुरू होती. कर्नाटकच्या दांदेली येथील एका जमिनीवरून पती-पत्नी यांच्यात वाद होता. पत्नी पल्लवीने काही महिन्यापूर्वी पतीविरोधात तक्रार दाखल केली. जेव्हा जेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही, तेव्हा तिने पोलीस स्टेशनसमोरच आंदोलन केले. तपासात पल्लवीला सिजोफ्रेनिया नावाचा एक मानसिक आजार असून त्यांच्या गोळ्या सुरू असल्याचं सांगितले जाते.
पोलिसांना पहाटे ४ वाजता एका निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. ओम प्रकाश हे १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. मार्च २०१५ मध्ये त्यांची कर्नाटकचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली. यापूर्वी त्यांनी अग्निशमन, आपत्कालीन सेवा आणि गृहरक्षक विभागाचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे असं बंगळुरूच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त विकास कुमार यांनी माहिती दिली.