राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं राज्याच्या एका मंत्र्यांकडे मदतीची याचना केली आहे. मला वाचवा, मला ८ लाखात विकलं आहे. जर तुम्ही वाचवलं नाही तर एका मुलीच्या हत्येचं पाप तुमच्या माथी लागेल. मी त्या मुलाशी लग्न करणार नाही, आत्महत्या करेन अशा भावना अल्पवयीन मुलीनं राज्य सरकारमधील एका मंत्र्याला पत्र लिहून कळवल्या आहेत.
राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील सैपऊ येथील गावातील ही घटन आहे. याठिकाणी १५ वर्षीय मुलीनं राजस्थान सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री ममता भूपेश यांच्या नावानं पत्र लिहिलं आहे. त्यात युवतीने बळजबरीनं होणारं तिचं लग्न थांबवण्यासाठी मंत्र्यांकडे याचना केली आहे. इतकचं नाही तर जर माझ्या मर्जीविरोधात जर माझं लग्न लावलं तर मी आत्महत्या करेन असंही या युवतीने पत्रात लिहिलं आहे.
मंत्र्यांनी घेतली पत्राची तात्काळ दाखल
मंत्री ममता भूपेश यांच्या नावाने युवतीने हे पत्र ईमेलच्या माध्यमातून महिला आणि बालविकास विभागाच्या धैलापूर कार्यालयात पाठवलं आहे. या पत्रानंतर विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. महिला आणि बाल विकास विभागाचे अधिकारी भूपेश गर्ग यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत जिल्हाधिकारी राकेश कुमार जयस्वाल यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सैंपऊ उपखंडच्या सीडीपीओला या प्रकरणाचा तपास करुन लग्न थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनाही संबंधित प्रकरणावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या पत्रात काय म्हटलंय?
महिला आणि बालविकास मंत्री ममता भूपेश यांच्या नावाने लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, मी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आहे. माझे वडील जे दारु पितात आणि जुगार खेळतात ते बळजबरीनं माझं लग्न लावत आहेत. माझं लग्न १४ नोव्हेंबर २०२१ रोजी दुसऱ्या ठिकाणावर होणार आहे. माझ्या वडिलांनी नवऱ्याच्या कडच्या मंडळींकडून ८ लाख रुपये घेतले आहे म्हणजे मला विकले आहे. याची तक्रार मी स्थानिक पोलीस ठाण्यात केली. परंतु त्यांनी माझ्या वडिलांची साथ दिली.
तसेच तुम्ही माझ्यासाठी आईप्रमाणे आहात. मला या संकटातून वाचवा. हात जोडून तुम्हाला विनंती करतेय. जर तुम्ही मला मदत केली नाही तर एका मुलीच्या हत्येचं पाप तुमच्या माथी लागेल. कारण मी त्या मुलासोबत लग्न करणार नाही. त्याऐवजी मी आत्महत्या करेन. अल्पवयीन युवतीने लिहिलेल्या पत्रामुळे महिला आणि बालविकास विभागात खळबळ माजली. मंत्र्यांनी तात्काळ या पत्राची दखल घेत प्रशासनाला कामाला लावले.