कानपूर - सिंगापूर आणि मलेशिया येथून हनिमूनहुन केरळ येथे होम क्वारंटाइन असणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याने घरातून पळ काढला असल्याचं समोर आलं आहे. आता राज्य सरकारने त्याच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
उत्तर प्रदेशात राहणारे अनुपम मिश्रा केरळच्या कोल्लम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. अनुपम यांचं नुकतेच लग्न झाले होते. पत्नीसोबत हनिमूनसाठी सिंगापूर आणि मलेशिया येथे गेले होते. 19 ला अनुपम परदेशातून परतला.
हा अधिकारी सरकारी निवासस्थानी होम क्वारंटाइमध्ये होता. अधिकाऱ्याने घरातून पळ काढत उत्तर प्रदेशातील आपल्या मूळगावी धाव घेतली. अनुपम मिश्रा यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कठोर कारवाई केली जाणार असल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुपम मिश्रा परदेशातून प्रवास करुन आले असल्याने जिल्हाधिकारी अब्दुल नजीर यांनी त्यांना सरकारी निवासस्थानी विलगीकरणात राहण्याचा आदेश दिला होता.
अशी झाली पोल खोलआरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्याकडून दररोज केल्या जाणाऱ्या पाहणीत अनुपम मिश्रा हे घऱात नसल्याचं आढळून आलं अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी अब्दुल यांनी दिली आहे. तपास केला असता अनुपम मिश्रा उत्तर प्रदेशात पोहचल्याची माहिती समोर आली. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. दरम्यान, केरळमधील अधिकारी उत्तर प्रदेशमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. सरकारने लॉकडाऊन जाहीर केला असतानाही त्यांनी राज्याबाहेर प्रवास कसा केला याची चौकशी केली जात आहे. तसेच अनुपम मिश्रा यांच्या संपर्कात आलेल्या सुरक्षारक्षक आणि इतरांना विलगीकरणात जाण्यास सांगण्यात आलं आहे.