रांची - मनरेगा घोटाळ्यामध्ये आयएएस पूजा सिंघल त्यांचे पती अभिषेक झा आणि चार्टर्ड अकाऊंटंट सुमन सिंह यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. रांची येथील ईडी कार्यालयात सलग चौथ्या दिवशी तिघांची चौकशी केली जात आहे. यादरम्यान, इडीच्या मागणीनंतर सुमन कुमार यांची रिमांड पाच दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. सुमन यांच्यासोबतच ईडीने स्पेशल कोर्टाने पूजा सिंघल यांनाही पाच दिवसांची रिमांड दिली आहे. दोघांनाही १६ मे रोजी एकत्रच कोर्टात हजर केलं जाईल.
दरम्यान, पूजा सिंघल आणि सुमन कुमार यांच्याकडून चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीनंतर ईडीने कांके रोड येथील सरावगी बिल्डर्सच्या मालमत्तांवर धाड टाकली. यादरम्यान, टीमला महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रे मिळाली. सुमन कुमार यांच्या रिमांडचा अवधी वाढवण्यासाठी ईडीने कोर्टामध्ये या कागदपत्रांचा उल्लेख केला होता. पूजा सिंघल हिच्या चौकशीनंतर सरावगी बिल्डर्स अँड प्रमोटर्स लिमिटेड बाबत ईडीला माहिती मिळाली होती. त्यानंतर बुधवारी ईडीच्या टीमने छापेमारी केली.
आयएएस अधिकारी पूजा सिंघल आणि तिचे पती अभिषेक झा यांनी मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून जमवलेले कोट्यवधी रुपये पल्स रुग्णालयांसाठी जमीन खरेदी करण्यासाठी आणि निर्मिती कामांसाठी खर्च केले. पूजा सिंघल यांच्या व्हॉट्स अॅप चॅटमधून या गोष्टींचा उलगडा ईडीसमोर झाला आहे. यादरम्यान, झारखंड सरकारने आयएएस अधिकारी पूजा सिंगल यांना निलंबित केले आहे.