बिहारच्या एका आयएएस अधिकाऱ्याकडे बेहिशोबी मालमत्ताच सापडली आहे, तसेच तो लाच म्हणून महागड्या गाड्यांची मागणी करत असल्याचंही समोर आलं आहे. संजीव हंस असं या IAS अधिकाऱ्याचं नाव आहे. आयएएस प्रशिक्षणानंतर, संजीवला बिहारच्या बांका जिल्ह्याचं एसडीएम बनवण्यात आलं आणि अशा प्रकारे प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली.
संजीवला वडिलांकडून खूप काही शिकायला मिळालं. वडील राज्य प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. अशा परिस्थितीत संजीवने आपल्या वडिलांप्रमाणे अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं, पण पैसे कमावण्याच्या लालसेने आता त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आयएएस संजीव हंस आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते.
ईडीने याचदरम्यान दीड कोटी रुपयांचं सोनं, ८७ लाख रुपयांची रोकड आणि ११ लाख रुपयांची चांदी जप्त करण्यात आली आहे. आता, ईडीनुसार, बिहारच्या विशेष देखरेख युनिटने (SVU) आयएएस अधिकारी संजीव हंस आणि झांझारपूरचे माजी आमदार गुलाब यादव यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
संजीवबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत, असं सांगितलं जात आहे की, तो ऊर्जा विभागाचा प्रधान सचिव तसेच बिहार स्टेट पॉवर होल्डिंग कंपनी लिमिटेडचा सीएमडी असताना स्मार्ट मीटर इंस्टॉलमेंट मोहीम राबवली होती. यावेळी त्याने मीटर बसविणाऱ्या कंपनीकडून लाच म्हणून मर्सिडीज कार घेतली. संजीवने चंदीगड, गोवा आणि पुणे या ठिकाणी संपत्ती घेतली आहे.
एका महिलेने संजीव हंस आणि माजी आमदार गुलाब यादव यांच्यावरही सामूहिक बलात्काराचा आरोप केला होता, याप्रकरणी पीडितेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली होती. आता सुप्रीम कोर्टात केस दाखल केली आहे. एफआयआरमध्ये असं उघड झालं आहे की संजीव हंस महिलेसोबतचे संबंध लपवण्यासाठी महिलेला दरमहा दोन लाख रुपये खर्च देत असे.