इंटरनेटवर एका पदार्थात दुसरा पदार्थ मिक्स करून काही विचित्रच रेसिपी बनविल्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. अशातच हैदराबादच्या एका दुकानदाराने दारू आणि आईस्क्रीमबाबत जे केले ते पाहून अबकारी विभागाचे अधिकारी देखील चक्रावले आहेत.
हैदराबादच्या एका आईस्क्रीम पार्लरवर अबकारी विभागाने छापा टाकला आहे. फेसबुकवरून हा पठ्ठ्या त्याच्या व्हिस्की आईस्क्रीमची जाहिरात करत होता. रिल्सही बनले होते. ते पाहून अबकारी विभागालाही दारुची झिंग चढली. सत्यता पडताळण्यासाठी ते थेट त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये पोहोचले. तर खरोखरच व्हिस्की असलेले आईस्क्रीम दुकानात मोठ्याप्रमाणावर सापडले.
एवढेच नाही तर कर चुकवून आणलेली व्हिस्कीही मोठ्या प्रमाणावर सापडली. जवळपास 11.5 लीटर व्हिस्की त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये होती. दारू आणि आईस्क्रीम जप्त करून अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
हे आईस्क्रीम पार्लर शरथ चंद्र रेड्डी चालवत होता. तो प्रत्येक किलोभर आईस्क्रीममध्ये ६० चा पेग मिक्स करत होता व हे आईस्क्रीम चढ्या दराने विकत होता. या गुन्ह्यात त्याच्या अन्य सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.