पुणे : हिमाचल प्रदेशामधून थेट पुण्यात चरसची तस्करी करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून तब्बल साडे अकरा लाख रुपयांचे 2 किलो चरस मिळाला आहे. वीरेंद्र घाथुराम शर्मा (वय ४०, रा. जगतसुख, ता. मनाली, जि. कुल्ला, हिमाचल प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.शहरातील अवैध धंदे रोखण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू असताना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला एक जण हिमाचल प्रदेशातून कारमध्ये चरस घेऊन नाशिकमार्गे पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने खडकी परिसरात सापळा रचून गाडी पकडली. कारमधील शर्मा त्याची झडती घेतली. पण त्याच्याजवळ काहीच आढळले नाही. त्यानंतर गाडी जवळ असलेल्या मॅकॅनिककडे नेण्यात आली. तेथे तपासणी केल्यावर गाडीच्या मागील दरवाज्याच्या वरील बाजूचे टफचे कुशनमध्ये निळ्या रंगाच्या कापडी पिशवीमध्ये १ किलो ९.५ ग्रॅम चरस आढळून आला. त्याची किंमत ११ लाख ४३ हजार रुपये इतकी असून गाडीही जप्त करण्यात आली आहे.
अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, गुन्हे उपायुक्त बच्चन सिंह, पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मागर्दर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, राहुल उत्तरकर, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, प्रदीप गाडे यांनी ही कारवाई केली.गाडी अडवू नये म्हणून केली युक्तीअंमली पदार्थाची वाहतूक करताना गाडी कुठेही अडवू नये म्हणून त्याने हिमाचल प्रदेशातील एक महिला, तिच्या २ मुली व एका लहान मुलाला बरोबर घेतले होते. त्यांना पुण्यात फिरवून आणतो आणि वरून १० हजार रुपये देतो असे खोटे बोलून गाडीतून आणले होते. परंतु, पोलिसांना गाडीची माहिती असल्याने पोलिसांनी त्याची गाडी अचूकपणे हेरली. या महिलांना गाडीत चरस असल्याची काहीही माहिती नव्हती. शर्माचा कारनामा पाहून त्यांनाही धक्का बसला.हिवाळ्यात हिमाचल प्रदेशमध्ये चरसचा हंगामाच असतो. तेथे चरस सव्वा लाख रुपये किलो मिळतो. मध्यस्थाला तो दोन ते अडीच लाखाला विकला जातो. पुढे मध्यस्थ हे चरस पुढे किंमत दुप्पट करून सहा लाखापर्यंत विकतो.