मडगाव: संपूर्ण गोव्याचे लक्ष ज्या तपासाकडे लागले आहे त्या स्वप्नील वाळके खून प्रकरणातील संशयितांची ओळख परेड सुरू झाली असून 4 साक्षीदारांनी त्यांची ओळख आतापर्यंत पटविलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयात ही प्रक्रिया चालू असून गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवसात एकूण 4 साक्षीदारासमोर ही परेड झाली. या प्रकरणातील संशयितांबरोबर अन्य डमी संशयित ठेवण्यात आले होते मात्र साक्षीदारांनी मुश्ताफा शेख आणि इव्हेंडेर रोड्रिक्स या दोघांची ओळख बरोबर पटविली.
2 सप्टेंबर रोजी भर बाजातात स्वप्निल वाळके या सराफाचा दिवसाढवळ्या खून झाला होता. हा खून करून पळून जाणाऱ्या संशयितांना एकूण 14 जणांनी पाहिले होते. या चौदाही साक्षीदाराकडून न्यायालयासमोर संशयितांची ओळख पटवून घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया पुढील आठवडाभर चालणार आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे.
या खून प्रकरणात तपास करणाऱ्या क्राईम ब्रँचने वरील दोन आरोपीसह ओंकार पाटील याला अटक केली होती. पाटील याने मडगावच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून हा अर्ज सोमवारी सुनावणीस येणार आहे.
पोलिसांच्या दाव्याप्रमाणे या तिन्ही आरोपीनी सहा महिन्यांपूर्वी वाळके यांचा खून करण्याचे कारस्थान रचले होते. त्यासाठी लॉकडाऊनच्या काळात संशयितांनी बिहारात जाऊन देशी कट्टा विकत घेऊन आणला होता. या प्रकरणी पोलिसांनी नुकतेच बिहारमध्ये जाऊन आणखी तीन सांशीयतानाही अटक केली होती. सध्या या प्रकरणाला सुमारे 50 दिवस झाले असून पुढच्या 40 दिवसात पोलिसांना या प्रकरणात आरोपपत्र दाखल करावे लागणार आहे.
पिस्तुलातून झाडलेली गोळी सापडली
स्वप्नील वाळके यांना मुश्ताफाने सुऱ्याने भोकसण्याआधी त्यांच्यावर गोळी झाडली होती. ज्या पिस्तूलातून ही गोळी झाडण्यात आली ते पिस्तूल जरी पोलिसांनी जप्त केले असले तरी झाडलेली गोळी सापडली नव्हती. पण मागच्या आठवड्यात ही गोळीही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. ही गोळी दुकानात असलेल्या इन्व्हर्टरखाली गेली होती. त्यामुळे सुरवातीला ती पोलिसांना शोधूनही मिळत नव्हती. ही गोळी सापडल्याने महत्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.