कल्याण : कार खरेदी करण्यासाठी दिलेले चार लाख परत मागितल्याने दोघा जणांनी दाम्पत्याला बनावट पोलिसांकडून काश्मिरी दहशतवादी ठरवण्याचे धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकरम कुरेशी व आदेश सिंग या भामट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून अकरमला अटक झाली आहे. या प्रकाराने पोलीसही चक्रावून गेले आहेत.
पश्चिमेकडील गोविंदवाडी-कचोरे परिसरात परवीन सय्यद ही महिला कुटुंबासह राहते. परवीन यांचे पती झुबेर हे अमेरिकेला नोकरीला होते. तेथून नोकरी सोडून झुबेर हे घरी परतले आहेत. या दाम्पत्याला पाच मुले असून दोघे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. पती घरी परतल्यामुळे कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी काहीतरी व्यवसाय करण्याचा परवीन विचार करत होत्या. त्यांना त्याच परिसरात राहणाऱ्या अकरम आणि आदेश यांनी कारखरेदी करून ओला कंपनीला लावण्याचे सुचवून कारखरेदीसाठी चार लाख रुपये मागितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून परवीन यांनी पैसे दिले; मात्र बरेच दिवस उलटूनही कार न मिळाल्याने त्यांनी दोघांकडे विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत बोलण्यास नकार दिला. त्यामुळे परवीन यांनी पैसे परत मागितले असता दोघांनी परवीन आणि झुबेर यांना ठाण्याला नेले. तेथे तोतया पोलिसांकरवी दोघांना धमकावून पैसे मागितल्यास पोलिसांना तुम्ही काश्मिरी दहशतवादी असल्याचे सांगून तुरुंगात डांबू, असे सांगितले. अशा प्रकारे चार महिने या कुटुंबाला धमकावले जात होते. अखेर, या त्रासाला कंटाहून परवीन यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकरम व आदेश यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अकरमला अटक केली आहे. त्याचा साथीदार आदेशचा शोध घेत आहेत.पेहरावावरून रचला कटपरवीनचा पती झुबेर हा परदेशात असल्याने त्याच्याकडे आधारकार्ड नव्हते. त्याने आधारकार्ड तयार केले आहे. झुबेरचा पेहराव पाहून फसवणूक करणाºया दुकलीने त्यांना काश्मिरी दहशतवादी ठरविण्याचा कट रचला होता. परवीनने पोलिसांकडे धाव घेतल्याने या फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे.