वाशिम : मानोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २६ मे रोजी काही युवकांनी केलेल्या चाकुहल्ल्यात एक जण ठार तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणातील सहा आरोपींविरुद्ध पोलिसांनी २६ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली. मुलीला त्रास दिला तर बघ असे म्हटले असता आरोपीने दोघांवरही सपासप वार केले होते.
फिर्यादी अनंता साहेबराव कुडवे (वय २०) रा. बेलोरा यांच्या तक्रारीनुसार, फिर्यादची चुलत मामे बहिण ही मांगकिन्ही (ता.दारव्हा) येथे राहत असून, चुलत बहिणीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी अनंता हा २५ मे रोजी मांगकिन्ही येथे गेलो होता. यावेळी गावातील प्रविण मळघने हा त्रास देत असून, त्याला समजावून सांगा, असे मामेबहिणीने अनंता यास सांगितले होते. यावरून अनंताने २६ मे रोजी प्रविणला फोन करून मामेबहिणीला त्रास का देतो, अशी विचारणा केली असता, मानोरा येथे मित्रासोबत येऊन दाखवतो, असे उलट उत्तर प्रविणने दिले. फिर्यादीने आतेभाऊ शिवदास (शिवा) उघडे याला घडलेला प्रकार सांगून शिवाजी चौकात बोलावून घेतले.सोबतच मानोरा येथील आतेभाऊ महेश मंदिलकर यालाही मित्रासोबत ये, असे सांगितले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शिवदास उघडे हा भुली येथील मित्र राहुल चव्हाण सोबत आला तसेच आतेभाऊ महेश मंदिलकरदेखील मित्र विराज विजय बडवे, सिद्दू संजय ठोंबरे, रवी एकनाथ मंदीलकर, शंकर वासुदेव वायले यांना घेऊन शिवाजी चौकात आले. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास प्रवीण मळघने, त्याचा भाऊ प्रदीप मळघने, पंजाब झळके, श्रीकांत (बाबड्या) दावने, अविनाश दावणे, अविनाश अगलदरे हे घटनास्थळी आले असता मुलीला त्रास देणे बंद कर, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील असे फिर्यादीकडील मंडळीने प्रविणला म्हटले. यावरून प्रवीण मळघने आणि अविनाश अगलदरे यांनी धारदार चाकू काढून शिवदास उघडे व राहुल चव्हाण यांच्या अंगावर गेले. शाब्दीक वाद भडकताच शिवदास उघडे व राहुल चव्हाण यांच्या पोटावर, छातीवर चाकूने वार केले. प्रवीणसोबत असलेले त्याचे मित्र पंजाब झळके, श्रीकांत (बबड्या) दावने, अविनाश दावणे, प्रदीप मळघणे यांनी फिर्यादी व रवी मंदीलकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये शिवदासचा मृत्यू झाला तर राहुल याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.
सहा जणांवर गुन्हा दाखल
अनंता कुडवे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रवीण मळघणे, प्रदीप मळघणे,पंजाब झळके,श्रीकांत (बबड्या) दावणे,अविनाश दावणे व गोरेगाव येथील आकाश अगलदरे या सहा आरोपी विरुद्ध कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०६, भा.दं.वी.प्रमाणे गुन्हा दाखल केला. श्रीकांत (बबड्या) दावणे आणि आकाश अगलदरे या दोघांना अटक केली असून, चार जण फरार आहेत. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कुचेकर करीत आहेत.