मुंबई - महाराष्ट्रामध्ये तशी मद्यपान आणि घरात मद्याचा साठा ठेवण्यावर कुठल्याही प्रकारची बंदी नाही आहे. मात्र जर तुम्ही घरामध्ये मद्यापासून बनलेली लिकर चॉकलेट ठेवली किंवा अशा प्रकारची चॉकलेट केली तर तुमच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. (liqueur chocolates) दरवर्षी महाराष्ट्र पोलिसांकडून अशी अनेक किलो लिकर चॉकलेट जप्त करत असते. राज्याच्या अबकारी विभागाने गेल्या आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या भागातून ४६.५ किलोग्रॅम वजनाची आयात केलेली लिकर चॉकलेट जप्त केली होती. याची किंमत सुमारे ४.३१ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. (If there are liqueur chocolates in the house, beware, there may be an arrest )
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रामध्ये सध्याच्या राज्य उत्पादन शुल्क आणि दारूबंदी कायद्यानुसार अल्कोहोलयुक्त चॉकलेटची निर्मिती, विक्री आणि साठा करण्यास परवानगी नाही आहे. या चॉकलेटचे सेवन अल्पवयीन मुले करू शकतात. त्या भीतीमुळे हा नियम करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ इंडियाने प्रसारित केले आहे.
२३ ऑगस्ट २०२१२ रोजी एका गुप्त सूचनेच्या आधारावर अबकारी विभागाचे इन्स्पेक्टर संतोष जगदाळे आणि प्रसाद सस्तूरकर यांच्या पथकाने एखा दुकानावर धाड टाकून तेथून डेन्मार्कवरून आयात केलेली लिकर चॉकलेट जप्त केली होती. यामधील काही चॉकलेटच्या १८७ ग्रॅमच्या १२ तुकड्यांना १६५० रुपयांना विकले जात होते. पोलिसांनी एकूण १७५ पॅकेट जप्त केले. तसेच या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी २५ ऑगस्ट रोजी कोर्टात चार्जशिट दाखल करण्यात आली होती. कोर्टाने या प्रकरणातील आरोपीवर ७५ हजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे.
नियम काय सांगतो?विशेष परमिट आमि लायसन्स नियम, १९५२ मध्ये लिकर चॉकलेटच्या निर्मितीची तरतूद होती. १९८० मध्ये याबाबत एक धोरण ठरवण्याचा विचार करण्यात आला. मात्र नंतर हे टाळण्यात आले. महाराष्ट्रामध्ये १९४९ ते १९६० या काळात दारूबंदी लागू होती. त्यामुळे अवैध मद्यविक्रीचे प्रमाण वाढले होते. नंतर मद्याच्या विक्रीला हळूहळू शिथिलता दिली गेली. मात्र कायदेशीररीत्या कुणालाही मद्याचा साठा करण्यासाठी आमि त्याचा वापर करण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. भारतीय निर्मित विदेशी मद्य प्राशन करण्यासाठीची वयोमर्यादा २५ वर्षे आहे. तर बियरसारख्या सौम्य मद्याच्या प्राशनासाठीचे वय २१ वर्षे आहे. वार्षिक किंवा आजीवन परवानाधारकांसाठी दरमहा १२ युनिट अल्कोहोलचा स्टॉक करण्याची परवानगी आहे. कलम ६५(ई) अन्वये मद्य साठा करण्यावर बंदी आहे.