अकोला : मामे बहिणीवर एकतर्फी प्रेम करून तिच्यासोबत काढलेल्या मोबाइल फोटोंचा दुरुपयोग करीत, ते फोटो फेसबुकवर टाकले आणि युवतीसोबत लग्न ठरलेल्या युवकाला आमचे प्रेमसंबंध असल्याचे सांगून तिच्या साक्षगंधात अडथळा घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीनुसार बोरगाव मंजू पोलिसांनी ३१ जानेवारी रोजी एका युवकाविरुद्ध उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. बोरगाव मंजू पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावातील २० वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार ती बीएससीला शिकते. तिचा आतेभाऊ याचे चौथीपर्यंत शिक्षण झाले असून, तो मजुरीचे काम करतो. आतेभाऊ या नात्याने हा युवक युवतीच्या घरी यायचा. युवतीनेही त्याला भाऊ मानून त्याच्यासोबत मोबाइलवर फोटो काढले. ७ महिन्यांपूर्वी युवकाने तिला तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगत, लग्नाची मागणी घातली, परंतु युवतीसोबतच तिच्या आई-वडिलांनी त्याला लग्नास नकार दिला. दरम्यान, युवतीची एका युवकासोबत सोयरिक जुळली. साक्षगंधाचा कार्यक्रम ठरला. ही बाब युवतीच्या आतेभावाला कळल्यानंतर त्याने, युवतीसोबत लग्न ठरलेल्या युवकाला फोन करून आमचे प्रेमसंबंध असून लव्ह मॅरेज झाल्याचे खोटे सांगितले. त्यामुळे मुलाकडच्या लोकांनी साक्षगंधाची तारीख पुढे ढकलली. एवढेच नाहीतर आतेभावाने त्या युवतीसोबत काढलेले फोटो फेसबुक व साेशल मीडियावर व्हायरल करीत तिची बदनामी केली. अशी तक्रार युवतीने बोरगाव मंजू पोलिसांकडे केली. पोलिसांनी तिच्या आतेभावाविरुद्ध भादंवि कलम ५०० व माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ कलम ६७ नुसार गुन्हा दाखल केला.
लग्न ठरलेल्या युवकाला फोटो पाठवले
युवकाने एकतर्फी प्रेमातून तिच्यासोबत लग्न ठरलेल्या युवकाला फोटो पाठवून व फोन करून माहिती सांगितली. तसेच त्या मुलाला त्याने, ती माझी झाली नाहीतर, कोणाचीही होऊ देणार नाही. अशी धमकी दिली. हे प्रकरण पाहून पोलीसही चांगलेच चक्रावून गेले.