बाबो! "जर घरात पैसेच नव्हते तर लॉक करायचं नव्हतं कलेक्टर"; चोरांनी लिहिलेली चिठ्ठी तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 11:02 AM2021-10-11T11:02:56+5:302021-10-11T11:03:58+5:30
Crime News : सध्या ही चिठ्ठी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सर्वत्र तिचीच चर्चा रंगली आहे.
नवी दिल्ली - चोरीच्या अनेक घटना या समोर येत असतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यामध्ये एक हटके प्रकरण घडलं आहे. उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरात चोरी झाली. पण चोरी करणाऱ्या या चोरांनी उपजिल्हाधिकाऱ्यासाठी एक खास चिठ्ठीही सोडली आहे. "जर घरात पैसेच नव्हते तर लॉक करायचं नव्हतं कलेक्टर" असं या चोरांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. सध्या ही चिठ्ठी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सर्वत्र तिचीच चर्चा रंगली आहे.
त्रिलोचन गौर (Trilochan Singh Gaur) असं या उपजिल्हाधिकाऱ्याचं नाव असून त्यांच्या घरात ही चोरी झाली आहे. देवास येथील खाटेगाव तहसीलमध्ये ते कार्यरत आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते घरी नव्हते. याच दरम्यान त्यांच्या घरात चोरटे शिरले होते. घरातील सामान सर्वत्र पडलेलं पाहिल्यानंतर आणि काही रोख रक्कम, दागिने चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस अधिक्षकांच्या घरापासून काही अंतरावरच ही चोरी झाल्याने हे पोलिसांसाठी मोठं आव्हान समजलं जात आहे.
In a strange incident of theft in Dewas, burglars not only broke into the house of a deputy collector but also left a note for him. "Jab paise nahi they toh lock nahi karna tha na collector! pic.twitter.com/mafaLj4gPC
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) October 10, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "30 हजार रोख रक्कम आणि काही दागिने त्रिलोचन गौर यांच्या सरकारी निवासस्थानावरुन चोरीला गेले आहेत. चोरी नेमकी किती वाजता झाली याची माहिती मिळालेली नाही" असं म्हटलं आहे. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं देखील म्हटलं आहे. याच वेळी चोरांनी एका खोलीतून डायरी आणि पेन काढलं. त्यातील एका पानावर "जर घरात पैसेच नव्हते तर लॉक करायचं नव्हतं कलेक्टर" असं लिहिलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.