पालघर जिल्ह्यातील कोरोनाला वेळीच आवर घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः कारवाईला सुरुवात केली असून तीन लग्नसमारंभातधाड घालून गर्दी जमविणे,मास्क परिधान न करणे आदी कोव्हीड19 गुन्ह्याखाली वधु-वर पित्यासह आयोजकाविरोधात रविवारी रात्री गुन्हे दाखल केले.
मागील दोन महिन्यांपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे शासन पातळीवरून लक्षात येऊ लागल्या नंतर कोव्हीड 19 अंतर्गत मास्क घालणे,सुरक्षित अंतर ठेवणे,सॅनिटायझर चा वापर करणे आदी बाबींची अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते.मात्र त्यांच्या आवाहनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाऊ लागल्या नंतर नियमांचे पालन न करणाऱ्या विरोधात कडक कारवाईचे अस्त्र उगारण्यात आले.
रविवारी जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन,पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे,प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर,तहसीलदार सुनिल शिंदे आदी नी शिरगाव येथील जलदेवी रिसॉर्ट मध्ये आयोजित लग्नसमारंभात मोठी गर्दी करणे प्रकरणी उमेश पाटील,कुंदन म्हात्रे तर शिरगाव गावातील तुषार ठाकूर,सातपाटी मधील चंद्रकांत तांडेल,तर बिरवाडी येथील वर आणि वधु पित्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले.
ह्या कारवाई चे पडसाद जिल्ह्यातील अनेक भागात उमटत असून लग्नसमारंभात 50 लोकांची उपस्थितीबाबत दक्षता घेण्यासाठी नियोजन करण्यावर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे मास्क वापरण्याबाबत नागरिक आता मोठ्या प्रमाणात दक्षता घेऊ लागले आहेत.