बलात्कारप्रकरणी IIT गुवाहटीच्या विद्यार्थ्याला जामीन, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिपण्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 04:33 PM2021-08-23T16:33:32+5:302021-08-23T16:34:03+5:30
याप्रकरणी तपास पूर्ण झाला आहे, सूचना देणारी पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही आयआयटी गुवाहटी संस्थेचे प्रतिभाशाली विद्यार्थी आहेत. ते भविष्यातील राज्याची संपत्ती आहेत.
गुवाहटी - कॉलेजमधील सहकारी मैत्रिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुवाहटी उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यास जामीन मंजूर केला आहे. आयआयटीमध्ये शिकणाऱ्या या दोन्ही विद्यार्थ्यांना भविष्यातील राज्याची संपत्ती असल्याचंही कोर्टाने म्हटले आहे. आरोपी विद्यार्थी हा बीटेकचा विद्यार्थी असून सर्व पुराव्यांच्या आधारावरच याचिकाकर्त्याविरुद्ध प्रथमदर्शनी स्पष्टपणे खटला दिसून येत आहे.
याप्रकरणी तपास पूर्ण झाला आहे, सूचना देणारी पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही आयआयटी गुवाहटी संस्थेचे प्रतिभाशाली विद्यार्थी आहेत. ते भविष्यातील राज्याची संपत्ती आहेत. त्यामुळेच, आरोप निश्चित झाले असल्यास आरोपीला तुरुंगात ठेवणे आवश्यक नसल्याचं उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती अजित बोरठाकूर यांच्या खंडपीठात याप्रकरणी सुनावणी झाली.
13 ऑगस्ट रोजी न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला आहे. त्यानुसार, 19 व 21 वर्षे वयाचे हे दोन्ही तरुण असून दोघेही वेगवेगळ्या राज्यांचे रहिवाशी आहेत. दोषारोपपत्रात दाखल पुराव्यांची पुरवणी पाहिल्यानंतर आरोपीची जामीनवर सुटका करण्यात आली आहे. कारण, आरोपीकडून पुरावे नष्ट करण्याचे किंवा त्यांमध्ये छेडछाड करण्याची शक्यता दिसत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने आरोपीला 30 हजाराच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, 28 मार्च रोजी आरोपीने मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर, पीडितेला दुसऱ्याच दिवशी रुग्णालयात दाखल केले होते. तर, पोलिसांनी आरोपीला 3 एप्रिल रोजी अटक केली.