मुंबई - मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अंधेरी येथून कुख्यात गुंड इजाज लकडावाला याचा चुलत भाऊ समीर लकडावालाला बेड्या ठोकल्या आहेत. जामिनावर सुटून फरार झालेल्या समीरला तब्ब्ल पाच वर्षांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. २०१२ सालच्या एका खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती.
२०१२ साली खंडणीच्या आरोपाखाली समीर लकडावालाला खंडणी विरोधी पथकानेअटक केली होती. त्यानंतर जामिनावर समीर जेलमधून सुटला आणि फरार झाला होता. राजस्थानमधील अजमेर येथे समीर रूप पालटून लपला होता. दरम्यान त्याने मुंबईतील मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी संपर्क तोडला होता. मात्र, गुन्हे शाखेच्या पोलिसांना समीर हा अंधेरी येथे येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून बुधवारी समीर आणि त्याचा साथीदार मोहम्मद अर्शद शेख उर्फ छोटा अर्शद याला अटक करण्यात आली. समीरविरोधात गुन्हे शाखेत बरेच खून, खंडणी आणि दंगलीचे गुन्हे दाखल आहेत.