नागपूर - देशी दारू विक्रेत्यांनी सार्वजनिक ठिकाणी शेड उभारून अनधिकृत बार उभारल्याचे दिसून येताच परिमंडळ तीनचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी त्यांना बुधवारी रात्री चांगलाच दणका दिला. त्यांच्या अवैध बारचे शेड उध्वस्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कमाल चाैकातील ईश्वरलाल जयस्वाल यांच्याकडे देशी दारू दुकानाचा परवाना आहे. तेथे फक्त ग्राहक उभे राहूनच दारू घेऊन पिऊ शकतात. मात्र, जयस्वालने पार्किंग करीता असलेल्या सार्वजनिक जागेत अतिक्रमण करून शेड उभारले. तेथे ग्राहकांसाठी टेबल खुर्चीही टाकली आणि बारच्या थाटात अवैध व्यवस्था केली. काही पोलिसांसोबत मधूर संबंध असल्याने जयस्वालची ही दुकानदारी अनेक दिवसांपासून बिनधास्त सुरू होती. ही माहिती कळताच पोलीस उपायुक्त राजमाने यांनी या अवैध बारवर पाचपावली पोलिसांकडून बुधवारी रात्री छापा घालून घेतला. त्यानंतर दुकानमालक ईश्वरलाल जयस्वाल, ४ मध्यपी तसेच त्यांना दारू व चखना पुरविणाऱ्या दोघांविरुद्ध पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशीच दुसरी कारवाई पाचपावलीतील राजेश गोपाल शेंडे नामक दारू विक्रेत्यावरही करण्यात आली. येथे शेंडेसह एकूण पाच जणांना आरोपी बनविण्यात आले. पाचपावलीचे निरीक्षक रवी नागोसे, सहायक निरीक्षक चंद्रकांत कोसे आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
तहसीलमध्ये सावजींवरही कारवाई
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चमन सावजींमध्येही पोलिसांनी धडक दिली. येथे बसलेले ८ ग्राहक दारू पिताना आढळल्यामुळे पोलिसांनी सावजी तसेच दारू पिणाऱ्या ८ ग्राहकांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध एपीआय बागुल यांनी दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.