लखनौ – उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या धर्मांतर करणाऱ्या रॅकेटवर कारवाई झाल्यानंतर आता याच्या तपासातून रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या धर्मांतरण रॅकेटसाठी ७ पद्धतीचे कोड वापरण्यात येत होते. हे सर्व कोड डिकोड करून त्याचा अर्थ उलगडला आहे. परंतु अद्याप एक कोड “कौम का कलंक” डिकोड होऊ शकलं नाही. उत्तर प्रदेशचे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी माध्यमातून कोड वर्ड आणि त्याचा खुलासा केला आहे.
काय आहेत हे कोड आणि त्याचा अर्थ?
रिवर्ट बॅक टू इस्लाम प्रोग्राम – धर्मांतर करणे
मुतक्की – हक्क आणि सत्याचा शोध
रहमत – परदेशातून येणारं फंडिंग
सलात – नमाज
अल्लाह के बंदे – सोशल मीडियावर व्हिडिओ लाईव्ह करणारा व्यक्ती
मोबाईल नंबर, जन्मतिथी – धर्मांतराचं नाव
‘कौम का कलंक’ कोडचं अद्याप डिकोड झालं नाही
उत्तर प्रदेश एटीएस मागील काही दिवसांपासून धर्मांतर करणाऱ्या गँगचा पर्दाफाश करत आहे. या गँगने तब्बल १ हजाराहून अधिक लोकांचे जबरदस्तीनं धर्मांतर केल्याचा आरोप आहे. गँगचे प्रमुख उमर आणि जहाँगीर यांना अटक केली आहे. हे इस्लामिक औषध सेंटरच्या नावाखाली संस्था चालवत होते. जी महिला आणि मूक बधिर मुलांच्या धर्मांतरासाठी काम करते.
सुटकेसाठी संघटना सरसावल्या
उमर गौतम आणि जहाँगीर यांच्या अटकेनंतर त्यांच्या सुटकेसाठी नवी दिल्लीतील स्टूडेंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांनी पुढे येऊन त्यांना सोडण्याची मागणी केली आहे. राज्य सरकार त्यांच्या राजकीय फायद्यासाठी समाजात द्वेष पसरवण्याचं काम करतंय त्यात मिडियाचा एक मोठा गटही काम करतोय असा आरोप या संघटनेने केला.
७ महिन्यात ५० तक्रारी
मागील ७ महिन्यात उत्तर प्रदेशात ५० धर्मांतराच्या तक्रारी आल्या आहेत. महिन्याला ७ गुन्हे नोंद झाले आहेत. पोलीस अधिकारी प्रशांत कुमार म्हणाले की, ज्याठिकाणी जबरदस्तीनं धर्मांतर केलं जातंय त्याठिकाणी तातडीने पोलीस कारवाई करत आहेत. ५० पैकी २२ प्रकरणात पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. तर २५ प्रकरणात अद्याप चौकशी सुरू आहे. तर ३ प्रकरणात पोलिसांनी अंतिम अहवाल तयार केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत ७८ जणांना अटक केली. ५ जणांनी कोर्टात सरेंडर केले. आरोपींपैकी ६७ जेलमध्ये, १६ जामीनावर बाहेर आहेत तर २५ आरोपी अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडले नाहीत.