नाशिक: अवैधरित्या सावकारी करणारा वैभव यादवराव देवरे याच्याविरुद्ध शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्यात दुसऱ्या दिवशी देखील गुन्हा दाखल करण्यात आला. सलग दोन गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली असून खासगी सावकारांचा फास गरजवंतांच्या गळ्याभोवती घट्ट आवळला असल्याचे दिसते. व्याजाची दिलेली रक्कम व व्याज परत न केल्याने महिलेस शिविगाळ करत तुझ्या पतीला मारून टाकेल अशी धमकी देवरे याने दिली.
अवैध सावकार व खंडणीखोर देवरेकडे गडगंज माया असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून आर्थिक गुन्हे अन्वेशन विभागाचा चौकशीचा ससेमिरा त्याच्या मागे लागणार अवल्याची शक्यता आहे. देवरे हा एका राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी आहे. शहरात अवैध सावकारीचा हा सहा महिन्यातील सातवा गुन्हा दाखल झाला आहे.
देवरे याने फिर्यादी पल्लवी पाटील (रा.श्रीजी निकेतन अपार्टमेंट इंदिरानगर) यांची चारचाकी दोन वाहने पैसे परत घेण्याच्या नावाने जबरदस्तीने सोबत नेले. ५ फेब्रुवारी २०२२ मध्ये पुणे येथे व्यवसायासाठी पल्लवी पाटील यांना तीन लाख रुपये लागत होते. देवरे यांनी तुम्हाला मदत करू शकतो परंतु दिलेल्या रुपयावर दहा टक्के व्याज होईल. घेतलेले पैसे लगेच दुसऱ्या महिन्यात परत न केल्यास दुप्पट म्हणजे सहा लाख रुपये होतील, असे सांगितले.
पाटील यांना पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी होकार दिला. देवरे यांनी दुसऱ्या दिवशी पाटील यांना तीन लाख रुपयाचा धनादेश वटवून आणा यातील तीस हजार रुपये मला व्याजाचे द्या, असे सांगितले. त्यावेळी दोन लाख ७० हजार रुपये पाटील यांना मिळाले. पंधरा दिवसही होत नाही लगेच देवरे याने पैशांसाठी तगादा सुरू केला, पैसे द्या नाहीतर तुमच्या पतीला मारून टाकीन अशा धमक्या पाटील यांना देवरे देत होता. फिर्यादीची दोन वाहने देवरेने बळजबरीने नेली.