मंगेश कराळेलोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: पूर्वेकडील परिसरात बेकायदेशीर व्हेल माश्याची उलटी विक्री व तस्करी करणाऱ्या चार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी रविवारी संध्याकाळी सापळा रचून अटक केली आहे. आरोपींकडून ७० लाखांची व्हेल माशाची उलटी हस्तगत करण्यात आली आहे. चारही आरोपीं विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालय परिसरात अवैद्य धंदे तसेच संरक्षीत प्राण्यांचे अवयव यांची बेकायदेशीर विक्री व तस्करी करणा-या इसमांविरुध्द कडक कारवाई करुन पायबंद करणे बाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट तीनचे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळवली. रविवारी संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास मिळालेल्या बातमीवरुन पूर्वेकडील रेल्वे स्टेशनजवळ, रेजिन्सी हॉटेलमधील रूम नं १०९ मध्ये आरोपी तरुणकुमार गिरीशभाई तांडेल (२५), श्रावणकुमार भावेश भाई तांडेल (२४), उपेनकुमार कांतीलाल तांडेल (२७) आणि राधेशाम दिनानाथ गुप्ता (३५) यांच्याजवळ शासनाने प्रतिबंधित केलेले ७८८ ग्रॅम वजनाचे ७० लाख रुपये किंमतीचे व्हेल माश्याची उलटी ही बेकायदेशीर रित्या विक्री करण्याच्या उददेशाने जवळ बाळगतांना मिळुन आले आहे. आरोपी विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करून आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. वरील कामगिरी अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), अमोल मांडवे, सहा.पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मुकेश तटकरे, सागर बारवकर, सचिन घेरे, शंकर शिंदे, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे तसेच वनरक्षक पंकज यादव यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.
कोट
१) व्हेल माश्याची उलटी विक्री व तस्करी प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. सोमवारी वसई न्यायालयात आरोपींना हजर केल्यावर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - प्रमोद बडाख (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट तीन)