खामगाव: अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे टिप्पर जयपूर लांडे फाट्यानजीक पकडण्यात आले. मात्र, आरोपींनी नायब तहसीलदारांनी वाद घालून दोन बरास रेतीसह पाच लाख रूपयांचे टिप्पर घटनास्थळावरून पळवून नेले. लोकसभा निवडणुकीचे स्थिर पथक तपासणीसाठी तहसील कार्यालयाच्या वाहनात जात असताना ही कारवाई करण्यात आली.
तक्रारीनुसार, शेगाव येथील नायब तहसीलदार कल्याण आसाराम काळदाते ३४ शुक्रवारी रात्री लोकसभा निवडणुकीचे स्थिर तपासणीसाठी तहसील कार्यालयाच्या वाहनात जात होते. दरम्यान, जयपूर लांडे फाट्यानजीक एमएच २८ बीबी ७९०९ या टिप्परमधून रेती वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, या रेती वाहतुकीचे वैधता तपासणी हेतु टिप्पर चालकास तेथे थांबण्यास सांगितले. त्यावेळी टीप्पर चालकाने बनावट गौणखनिज वाहतूक पास सादर केली. या पासची महाखनिज ॲपवर तपासणी केली असता अवैध आढळून आल्याने टिप्पर शेगाव तहसील कार्यालयात जमा करण्याचे सांगितले.
तितक्यात ५३१० क्रमांकाच्या दुचाकीवरून एक इसम तिथे आला. त्याने वाद घालून टिप्पर चालकाला घटना स्थळावरून वाहन पळविण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर दोघेही आपआपली वाहने घेऊन घटनास्थळावरून बाळापूर रोडकडे पळून गेल्याचा आरोप तक्रारीत केला. या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीसांनी भादंवि कलम ३७९, १८६, ३४, सहकलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८(७) व ४८ (८) विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोहेकाँ विनोद शेळके करीत आहेत.