दिंडोरी (नाशिक) : तालुक्यातील जवळके दिंडोरी शिवारातील एका वेअर हाऊस मधील कंपनीत अवैध व अप्रमाणित सॅनिटायझरचा सुमारे आठ लाखाचा साठा दिंडोरी पोलिसांनी जप्त करत कारवाई केली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जवळके दिंडोरी शिवारातील नवीन संचेती वेअर हाऊस मधील मारुती इंटेस्टीज कंपनीत दिंडोरी पोलिसांनी छापा मारला असता तेथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेकायदा सॅनिटायझरचा सुमारे आठ लाखाचा साठा आढळून आला. त्यात पॅटसन सॅनिटायझरच्या 100 मिलीच्या सुमारे 5760 बाटल्या त्यात 3360 बाटल्यांवर बॅच उत्पादन तारीख एक्सपायरी तारीख किंमत असा काहीही उल्लेख नव्हता. तसेच 200 लिटरच्या दोन टाकीत सॅनिटायझर रसायन आढळून आले. याबाबत दिंडोरीचे पुरवठा अधिकारी रवींद्र निरभुवणे यांनी फिर्याद दिली. सदर बेकायदा सॅनिटायझर प्रकरणी अमित अलिम चंदांनी रा नवीन सिडको नाशिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत 792600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नाशिकमध्ये अवैध सॅनिटायझरचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 4:04 PM