भिवंडी - भिवंडी पोलीस उपायुक्त क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर हुक्का पार्लर सुरू असल्याची ओरड होत असतानाच पोलिसांनी अवैध हुक्का पार्लरमध्ये वापरले जाणारे साहित्य साठविल्याची खबर मिळताच या गोदामावर गुरुवारी छापा मारून सुमारे ३ कोटी रुपयांचा अवैध साठा जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईने अवैध हुक्का पार्लर चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
हुक्का पार्लरसाठी वापरले जाणाऱ्या तंबाखू जन्य पदार्थ यांचा गोदामात मोठा साठा करून ठेवल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना मिळाली असता त्यांनी वळ ग्रामपंचायत क्षेत्रातील पारसनाथ गोदाम संकुलातील इमारत क्रमांक ई /४ मधील गाळा क्रमांक १४, १५ व इमारत क्रमांक डी /३ मधील गाळा क्रमांक ६,७ या चार गोदामांवर वपोनि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिरसाठ व त्यांच्या पोलीस पथकाने एकूण चार गोदामात साठवलेला हुक्का पार्लरचे साहित्य व वापरात येणाऱ्या अल अकबर कंपनीच्या सुगंधित तंबाखूचा ३ कोटी ८ लाख ९६ हजार ७६० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून गोदाम मालक इरफान मो.अमीन सिद्दीकी ( रा.माझगाव मुंबई ) व गोदाम व्यवस्थापक फैसल रईस खान ( रा .भिवंडी) या दोघां विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिरसाठ हे करीत असून या गुन्ह्यातील आरोपींना अजून अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळते आहे.