औरंगाबाद: विधानसभा निवडणूकीला अवघ्य आठ दिवस उरले असताना सिडको पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन तरूणांकडून अवैध शस्त्रे जप्त केली. या कारवाईत दोन तलवारी आणि दोन कुकरी चाकू जप्त करण्यात आले.
सिडको पालिसांनी सांगितले की, १० आॅक्टोबर रोजी अमोल लहाने आणि त्याच्या साथीदारांनी कृष्णा जयवंत मोटे यास मारहाण केली होती. यानंतर कृष्णाने त्यांच्याविरोधात सिडको ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हा आरोपींनी कृष्णाला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीचे रेकॉर्डींग पोलिसांनी ऐकले होते. अमोल गणपत लहाने (२१,रा.मयुरपार्क, शिवेश्वर कॉलनी), योगेश नारायण घुगे (२०,रा.शिवनेरी कॉलनी) आणि प्रफुल्ल नामदेव बोरसे (१९,रा.कोलठाणवाडी रस्ता,हर्सूल परिसर)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
दरम्यान ते तलवार खरेदी करण्यासाठी नांदेड येथे कार घेऊन गेल्याची माहिती सिडको पोलिसांना कळताच पोलिसांना आरोपींच्या कारचा क्रमांक मिळाला होता. पोलीस आरोपींच्या मागावर असताना १२ आॅक्टोबर रोजी ते सिडको एन-५ मधील एमजीएम कॅम्पसमधील रस्त्याने कारने जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपायुक्त डॉ.राहुल खाडे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाचे उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर , हवालदार नरसिंग पवार, राजेश बनकर,दिनेश बन, सुभाष शेवाळे, प्रकाश डोंगरे, स्वप्नील रत्नपारखी, सुरेश भिसे, किशोर गाढे, लालखॉ पठाण यांच्या पथकाने रात्री साडेसात वाजेच्या सुमारास सापळा रचला. तेव्हा संशयित कार पोलिसांनी अडविली. कारमध्ये अमोल, योगेश आणि प्रफुल्ल हे बसलेले होते.
पोलिसांनी पंचासमक्ष कारची झडती घेतली असता कारमध्ये लपवून आणलेल्या दोन धारदार तलवारी, दोन धारदार पाते असलेल्या कुकरी चाकू पोलिसांच्या हाती लागली. या शस्त्रासह आरोपींना ताब्यात घेतण्यात आले. त्यांची कार जप्त करून त्याच्याविरोधात पोहेकॉ शेवाळे यांच्या तक्रारीवरून सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.