शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण रोड परिसरातील मांढरे वस्ती याठिकाणी एका इमारतीमध्ये पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत सुमारे तीस ते चाळीस लाखांचा अवैधरित्या साठविलेल्या गुटख्याच्या साठ्यासह तीन वाहने जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील चाकण रोड मांढरे वस्ती परिसरात एका इमारतीच्या आतमध्ये तीन खोल्यांमध्ये काही अवैधरित्या गुटख्याचा साठा केल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस नाईक तेजस रासकर, रविकिरण जाधव, अंबादास थोरे, अशोक केदार, विकास मोरे यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकल्यावर तीन वाहने तसेच इमारतीच्या खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठा मिळून आला. तर त्या ठिकाणी अंदाजे तीस लाख ते पस्तीस लाख रुपयांचा गुटखा असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र तिथे किती दिवसांपासून गुटखा साठविला जात आहे ? तो कुठून येत आहे ? याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
याविषयी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके यांनी सांगितले, शिक्रापूर येथील चाकण रोड परिसरातील मांढरे वस्ती याठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा साठवला जात असल्याची असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानंतर तिथे छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात गुटखा मिळून आला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिलेली आहे. तसेच मिळून आलेल्या गुटख्याचे मोजमाप सुरु आहे.पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत .