वैशाली - बलात्कार आणि खून प्रकरणात ज्यात पोलीस आरोपीचा शोध घेत होते, त्या प्रकरणात मृत मुलीचा एक व्हिडिओ पोलिसांसमोर आला, ज्यामध्ये मुलगी म्हणाली की, मी जिवंत आहे. ही खळबळजनक घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील आहे. याठिकाणी एका मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी पोलिसांना दिली होती.
२२ ऑगस्ट रोजी वैशाली जिल्ह्यातील रहिमापूरमध्ये बाकरपूर येथे राहणाऱ्या वडिलांनी आपल्या मुलीचे अपहरण केल्याबद्दल एफआयआर दाखल केला होता. दुसर्याच दिवशी एका मुलीचा मृतदेह सापडला, या मुलीसोबत बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मृतदेहाची ओळख मिटवण्यासाठी तिच्या शरीरावर अॅसिड टाकून जाळण्यात आले होते. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी हत्येसाठी एफआयआर नोंदविला आणि मारेकरीचा शोध सुरू केला.
परंतु या प्रकरणात पोलीस ज्या मेनका नावाच्या मुलीचं अपहरण आणि हत्येचा तपास करत होती. तिनेच एक व्हिडीओ जारी करत मी जिवंत असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी पोस्टमार्टम करून हत्येचा एफआयआर दाखल केला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. तीच मुलगी आता १० दिवसांनी पुन्ही सगळ्यांसमोर आली आहे.
व्हिडिओमध्ये मेनकाने स्पष्ट केले आहे की, तीने स्वत:च्या मर्जीने घरातून पळून जाऊन लग्न केले आहे. मात्र तिच्या वडिलांनी आणि कुटूंबाने खोटा गुन्हा दाखल करुन याला हत्येचं प्रकरण बनवलं आहे. तिने तिच्या घरातील लोकांना फोन करुन सांगितले की मी जिवंत आहे तरीही त्यांनी खोटा गुन्हा दाखल करत माझ्यावर अंत्यसंस्कारही करुन टाकले. आता बेपत्ता झालेल्या मेनकानेच समोर येऊन स्पष्टीकरण दिल्यानंतर पोलिसांसमोर नवीन गुंता तयार झाला आहे. कारण मुलीचं अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदवला नव्हता तर एका मुलीचा मृतदेहही सापडला होता. आतापर्यंत तो अपहरण झालेल्या मेनकाचा मृतदेह आहे असं समजून पोलिसांनी तपास केला होता. आता पुन्हा संपूर्ण प्रकरणाच्या सुरूवातीपासूनच पोलिसांनी याचा नव्याने तपास सुरू केला आहे, अंत्यसंस्कार केलेला मृतदेह कोणाचा होता हे शोधणंही पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.