मुंबई - मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर " प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट १९७१" च्या कलम ३ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी तक्रार भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात केली आहे.
काल मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आयोजित एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. 'जन गण मन अधिनायक जय है', असं ते बसून म्हणाल्या. त्यानंतर ते बोलता बोलता जागेवरुन उठल्या. यावेळी त्या राष्ट्रगीच्या उर्वरित ओळी बोलू लागल्या. "भारतभाग्यविधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग", इथपर्यंतच त्या राष्ट्रगीत म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी 'जय महाराष्ट्र, जय बंगाल, जय भारत', अशी घोषणा केली. त्यामुळे हा अत्यंत गंभीर प्रकार असून बेकायदेशीर रित्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांचा व रोहिंग्या अल्पसंख्याकांचा कायमच कळवळा असणाऱ्या व देशविघातक किंवा हिंदूविरोधी शक्तींना पाठबळ देणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी अशा प्रकारे राष्ट्रगीताचा अवमान करून तमाम भारतीयांच्या भावनांना ठेच पोहचविण्याचे काम केले आहे, असेही आमदार भातखळकर यावेळी म्हणाले.
तसेच, कायमच आपल्या कथित देशप्रेमाची महती सांगणारे शिवसेना नेते मात्र यावर मूग गिळून गप्प आहेत. अशा प्रकारे राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या समोर झुकण्याचे काम शिवसेनेने केले आहे हे, महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. पुढील चोवीस तासांच्या आत ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे ते म्हणाले.