पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म ६ वर लष्करी गणवेशात फिरणारा चक्क तोतया असल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच नाही तर त्याने लष्करी गणवेशात १५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्ल्यावर पासाशिवाय प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निरज विक्रम विश्वकर्मा (वय २०, रा. लटेरा, पो. धौराहरा, इटावा, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असे या तोतयाचे नाव आहे.
रेल्वे राखीव दलाचे पी के यादव, अशोक चांदूरकर यांना एक लष्करी अधिकारी प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर संशयितरित्या फिरत असल्याची माहिती शनिवारी मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी निरज विश्वकर्मा याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे कोणतेही ओळख पत्र नव्हते. त्याच्या गणवेशावर नेमप्लेट, पैरा बॅच, लेफ्टनंट असल्याचे बॅच आढळून आला. लष्करी गुप्तचर अधिकार्यांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर तो तोतया असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशीमध्ये निरज विश्वकर्मा हा लष्करी अधिकार्याचा गणवेश घालून दिल्ली कॅटोंमेंट परिसरात फिरला. तसेच १५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले होते. या वेळी त्याने लष्करी गणवेश घालून कोणताही पास नसताना प्रवेश केला होता. तेथे लष्करी अधिकार्यांबरोबर भेट घेतली. त्यांच्याबरोबर फोटो काढल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी या तोतयाला अटक केली आहे.