यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा येथे कुल्फी विक्रेत्याकडून कुल्फी घेऊन पैसे दिले नाही. पैसे मागितल्यावरून आरोपीने कुल्फी विक्रेत्याला बेदम मारहाण करत त्याचे दोन दात पाडले. या प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला दोन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरोधात आरोपी सत्र न्यायालयात अपिलात गेला. सत्र न्यायालयातही न्यायाधीश पी. बी. नाईकवाडे यांनी शिक्षा कायम ठेवली.
विशाल रमेश मोहुर्ले (४६) रा. सायखेडा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने १ जुलै २००९ रोजी कुल्फी विक्रेता उमेश भगवान सोनपुरे याच्याकडून कुल्फी घेतली. या कुल्फीचे पैसे उमेशने मागितले असता विशालने त्याला बेदम मारहाण केली. यात उमेशचे दोन दात पडले. याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी विशाल विरोधात कलम ३२५, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. केळापूर येथील प्रथम न्याय दंडाधिकारी यांनी विशाल मोहुर्ले याला दोन महिने कारावास व हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरोधात विशालने जिल्हा व सत्र न्यायाधीश पांढरकवडा यांच्याकडे अपिल दाखल केले. यात न्या. पी.बी. नाईकवाडे यांनी खटल्यातील संपूर्ण कागदपत्रांचे अवलोकन केले. दोनही पक्षांचा पुन्हा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर न्याय दंडाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत आरोपीची शिक्षा कायम ठेवण्याचा आदेश दिला. या खटल्यात अतिरक्त सरकारी वकील प्रशांत मानकर यांनी युक्तिवाद केला. त्यांना पांढरकवडा ठाण्यातील पैरवी अधिकारी जमादार संतोष राऊत यांनी सहकार्य केले.