खामगाव: मोबाईल रिचार्ज का करून दिले नाही, तसेच पैशांच्या कारणातून मित्रांच्या मदतीने स्वत:च्या वडिलांची क्रुर हत्या करणाऱ््या पुत्रासह तिघांना न्यायालयाने आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. खामगाव येथील सत्र न्यायाधीश ए.एस.वैरागडे यांनी हा महत्वपूर्ण निकाल शुक्रवारी दिला.
नांदुरा तालुक्यातील खडदगाव येथे २४ मे २०१६ रोजी सोनल विठ्ठल मानकर (२२), गणेश परमेश्वर पेसोडे (२२), वैभव जनार्दन लोणाग्रे या तिघांनी पैशांच्या मागणीसाठी संगनमत करून विठ्ठल निवृत्त मानकर (५५) यांची हत्या केली. याप्रकरणी मृतकाचा भाऊ रामकृष्ण निवृत्ती मानकर यांच्या तक्रारीवरून मध्यरात्री पिंपळगाव राजा पोलीसांनी तिनही आरोपीविरोधात भादंवि कलम ३०२, ५०६, सहकलम ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविला.
तपासाअंती खामगाव येथील न्यायालयात आरोपींविरुध्द आरोपपत्र दाखल करण्यात आले. खामगाव येथील जिल्हा न्यायाधीश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, ए.एस. वैरागडे यांनी सरकार पक्षातर्फे एकुण १९ साक्षीदार तपासले. यात प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रामकृष्ण वासुदेव मानकर व राजेंद्र साहेबराव मानकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयस्वाल, पंच साक्षीदार राहुल रामधन मख व गजानन पुंजाजी मिरगे, ओळख परेड करणारे अधिकारी यांचीही साक्ष महत्वाची ठरली.
त्यामुळे न्यायालयाने तिनही आरोपींना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रत्येकाला दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास एपीआय एस.एस. आहेरकर यांनी केला. याप्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील रजनी बावस्कार यांनी काम पाहिले. तसेच तत्कालीन कोर्ट मोहरर पो.कॉ.बाळु डाबेराव यांनी सहकार्य केले.
कट रचून केली हत्याघटनेच्या आधी आरोपींनी एका हॉटेलात कट रचला होता. सर्व आरोपी हे नांदुरा येथील शिवनेरी हॉटेलमध्ये दुपारी ०१.४५ से ०२.४५ च्या दरम्यान एकत्र आले. तेथून एकत्र घटनास्थळी आले व मृतकाची हत्या केली. ते सीसीटीव्ही फुटेज तपासादरम्यान जप्त करण्यात आले होते. त्यासंदर्भातील कारवाई करणारे पोकाँ सजित सोनार व तज्ञ तंत्रज्ञ अजगर खान अफसर खान यांचीही साक्ष महत्वाची ठरली.
पेशी दरम्यान पळाले होते दोन आरोपीतपासादरम्यान तिनही आरोपी जिल्हा कारागृह बुलढाणा येथे असताना कारागृहातून पोलीसांनी सर्व आरोपींना तारीख पेशीकामी जिल्हा व सत्र न्यायाधीशासमोर आणले होते. त्यावेळी आरोपी सोनल विठ्ठल मानकर व गणेश परमेश्वर पेसोडे हे न्यायालयातून पळून गेले होते. खामगाव पोलीसांनी लागलीच पाठलाग करून त्यांना पकडले . त्यानुसार आरोपींवर २२ जून २०१६ रोजी खामगाव शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.