अकोला - शहरातील कौलखेडस्थित मॉ रेणुका मराठी प्राथमिक शाळेतील एका कर्मचाऱ्याने तब्बल दहा चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयकाने दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हेमंत चांदेकर असं अटक केलेल्या आरोपी कर्मचाऱ्याचं नाव आहे. शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी ५ मार्चपासून बाहेरगावी गेल्या होत्या. शाळेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या आरोपीने या परिस्थितीचा गैरफायदा घेत इयत्ता चौथी ते सातवी शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थिनींशी शारीरिक लगट केली. शिक्षिका प्रशिक्षण आटोपून परत आल्यानंतर काही विद्यार्थिनींनी हा प्रकार त्यांना सागताच शिक्षिकांच्या पायाखालची वाळू सरकली.
कर्मचाऱ्याने गैरकृत्य केल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण संस्थाचालकांनी आरोपीला ८ मार्चपासून शाळेत न येण्याचा आदेश दिला. या प्रकाराची माहिती शाळेच्या संचालिका पल्लवी कुलकर्णी यांनी चाइल्ड हेल्पलाइनला कळवली. त्यानंतर या आरोपीच्या विरोधात चाइल्ड हेल्पलाइन तसेच जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या समन्वयक हर्षाली गजभिये यांनी ३० मार्च रोजी तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून खदान पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४,७५,८,९(एफ)(एम) पॉक्सोचे कलम १० तसेच बालन्याय अधिनियम २०२५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा प्रशासनानं घेतली गंभीर दखल
दरम्यान, सदर गंभीर प्रकरणाची माहिती चाइल्ड हेल्पलाईनच्या वतीने जिल्हा प्रशासनातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि बालकल्याण समितीकडे सादर करण्यात आली. त्यानंतर बालकल्याण समितीने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश चाईल्ड हेल्पलाईनच्या हर्षाली गजभिये यांना दिले. खदान पोलिसांनी आरोपी हेमंत चांदेकर याला ३१ मार्चला न्यायालयात हजर केले त्यानंतर चांदेकराची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.