अमरावती - सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात तरुणाई एकमेकांच्या अगदी जवळ आली आहे. मात्र त्याचाच घातक गैरवापर होत असल्याचंही अनेकदा पुढे आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका युवकानं मुलीसोबत मैत्री केली. हळूहळू मैत्रीचं रुपांतर मर्यादेपेक्षा पुढे गेले. अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर या धक्कादायक प्रकाराचा खुलासा झाला आहे.
या युवकाने मुलीला बंदुकीचा धाक दाखवत स्टॅम्प पेपरवर “मी तुझ्याशी लग्न करणार, १८ वर्षाची झाल्यानंतर तुझ्यासोबत पळून जाणार” असं लिहून घेतले आहे. ही मुलगी अल्पवयीन आहे. तर मुलगा विवाहित आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर विवाहित प्रियकर आणि त्याला मदत करणारी महिला नातेवाईकांविरोधात पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीच्या गाडगेनगर भागात ही घटना घडली असून या माथेफिरू प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी एक महिला आणि सैय्यद सोहेल गफ्फार नावाच्या आरोपीला अटक केली आहे. सैय्यद गफ्फार २३ वर्षाचा असून तो चांदणी चौकात राहायला आहे. पीडित तरुणी आणि सैय्यदची ओळख सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर मंदिरात जाण्याच्या बहाण्याने तरूणी घराबाहेर पडली आणि सैय्यदला भेटायला गेली. त्यानंतर दोघांमधील भेटी सातत्याने वाढत गेल्या. १९ ऑगस्ट २०२० रोजी सैय्यद सोहेलने बंदुकीचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मी तुझ्याशी लग्न करणार, १८ वर्षाची झाल्यावर दोघंही पळून जाणार असं लिहिलेले होते.
त्यानंतर सैय्यद सोहेलची महिला नातेवाईक पीडित तरुणीच्या घरी जात तिच्या वडिलांना भेटली. तुमच्या मुलीला सांभाळा अन्यथा सैय्यद तुमच्या मुलीला पळवून नेईल असं सांगितले. त्यानंतर महिला नातेवाईकाने सैय्यद आणि पीडित मुलीचे फोटो वडिलांच्या मोबाईलवर पाठवले. त्यानंतर वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. सैय्यद हा गुंड प्रवृत्तीचा मुलगा असून वारंवार तलवार, बंदूक दाखवत पीडित तरूणी आणि तिच्या कुटुंबाला धमकावत असतो असा आरोप तक्रारीत केला आहे. त्यानंतर पोलिसांनी सैय्यदला अटक केली असून त्याच्याविरोधात पॉस्को, धमकावणे, घरात घुसणे यासारख्या आरोपाखाली गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.