एका कोंबड्याला पकडण्यासाठी घरातील छोट्या मुलानं विहिरीत उडी मारली. खूप वेळ तो बाहेर न पडल्याने मोठ्या भावानेही पाण्यात उडी घेतली. परंतु ते दोघेही परत न आल्याने आणखी एका स्थानिक युवकाने विहिरीत उडी मारली. हे तिघेही पुन्हा बाहेर आले नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे एका कोंबड्यामुळे ३ जणांचा जीव गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
आसामच्या कछार जिल्ह्यात लखीमपूर इथं ही घटना घडली. याठिकाणी एका कुटुंबातील कोंबडा अचानक विहिरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी कुटुंबातील दोन भाऊ मनजीत देब आणि प्रोसेनजीत देब हे दोघे विहिरीत उतरले. मात्र खूप वेळ दोघं वर न आल्याने अमित सेन नावाचा स्थानिक युवकानेही विहिरीत उडी मारली. मात्र हे तिघेही पुन्हा वर आले नाहीत तेव्हा स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले त्यानंतर याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. पथकानं विहिरीतून ३ युवकांचे मृतदेह बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीत विषारी वायूमुळे या तिघांचे गुदमरून मृत्यू झाल्याचं समोर आले आहे.
दरम्यान, ही घटना दुर्दैवी असून विहिरीत पडलेल्या भावाला वाचण्यासाठी २ जणांनी विहिरीत उडी घेतली. परंतु तिघेही पुन्हा परतले नाहीत. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले अशी माहिती पोलीस अधीक्षक नुमल महत्ता यांनी दिले.