भिवंडी - मोलमजुरीसाठी पश्चिम बंगाल राज्यामधून आलेल्या दोघा कामगारांमध्ये जेवण बनविण्या वरून झालेल्या वादात एकाने आपल्या दुसऱ्या सहकारी कामगाराची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना भिवंडीत बुधवारी रात्री घडली आहे.दीपक बर्मन वय ३५ मुळ रा. पश्चिम बंगाल असे मयत कामगाराचे नाव आहे.
पश्चिम बंगाल राज्यातील पिज्यु बर्मन व त्याचा मित्र असे दोघे भिवंडीत यंत्रमाग कारखान्यात मोलमजुरी करण्यासाठी वंजारपट्टी नाका परिसरातील एका कारखान्यात राहून तेथेच वास्तव्यास होते.त्यांच्याकडे त्यांच्याच गावातील दीपक बर्मन हा कामाच्या शोधात आला. या दोघांनी त्यास आपल्या सोबत ठेवून घेत काम सुध्दा लावले.दरम्यान बुधवारी रात्री काम उरकल्यावर पिज्यु याने दीपक यास जेवण बनविण्यास सांगितले.दीपक याने आपणास जेवण बनवीता येत नसल्याचे सांगत जेवण बनविण्यास नकार दिला .यावरून पिज्यु व दीपक यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारी झाली.त्यात पिज्यु याने दीपक याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे.या घटनेची माहिती मिळताच निजामपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार,सहाय्यक आयुक्त सुनील वडके पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपक चा मृतदेह ताब्यात घेत हत्येची माहिती घेतली असता हत्या करणारा पिज्यु घटनास्थळा वरून फरार होऊन पसार होण्याच्या तयारीत असल्याचे समजताच निजामपुरा पोलिसांनी लपून बसलेल्या पिज्यु च्या अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.