- नितिन पंडीत
भिवंडी ( दि. ९ ) भिवंडीत वाहन चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी परिमंडळ दोन मधील पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यांना आपआपले पोलीस ठाणे हद्दीत सतर्क राहण्याचे आदेश दिल्या नंतर पूर्व विभागाचे पोलीस आयुक्त प्रशांत ढोले तसेच शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी शांतीनगर पोलीस स्टेशन हददीत घरफोडीचे व वाहन चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणले असुन सात आरोपीतांना ताब्यात घेतले आहे.
आरोपींकडून घरफोडी प्रकरणातील ३ लाख ९८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असू वाहन चोरीतील १ लाख ८५ हजार रुपये किंमतीची वाहने असा एकूण ५ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून सात जणांना अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस आयुक्त योगेश चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११० ग्राम वजनाचे ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचे दागिने, १ रिक्षा ३ मोटर सायकल , १५०० रुपये किंमतीचे पितळी रॉड तर १७ हजार रुपये किंमतीचे ट्रॅक पँटचे अशा सात चोरीचे गुन्हे तर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक रिक्षा व एक मोटर सायकल असे दोन गुन्हे अशा प्रकारे शहर व शांतीनगर पोलीस ठाण्यात एकूण ९ गुन्ह्यांचा तपास भिवंडी पोलिसांनी लावला असून याप्रकरणी सात जणांना अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त चव्हाण यांनी दिली आहे.