बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एका पोलीस ठाण्यात हायव्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. याठिकाणी एका महिलेसाठी २ पतींमध्ये भांडण झालं. ही माझी पत्नी आहे असं सांगत दोघांनीही एकाच महिलेवर दावा सांगितला. खूप वेळ सुरू असलेल्या नाट्यात अखेर पत्नीने दोघांमधील एकाची निवड केली. मात्र या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात अधिकारी, कर्मचारीही हैराण झाले होते.
गुरुवारी पोलीस ठाण्यात एका महिलेवर दोन पुरुषांनी दावा केला. ही महिला ३ मुलांची आई आहे. तिला १८ आणि २० वर्षीय २ मुले आणि १३ वर्षीय एक मुलगी आहे. एक पत्नी आणि दोन पती या गोंधळात पोलीस हे प्रकरण सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुजफ्फरपूर जिल्ह्यातील बखरी गावातील रहिवासी राम प्रसाद मेहतो यांचं २२ वर्षापूर्वी मझौली गावातील मुलीसोबत लग्न झालं होते.
लग्नानंतर त्यांना २ मुले आणि एक मुलगी झाली, मात्र २०१८ मध्ये पती-पत्नीत वाद निर्माण झाला. त्यानंतर पत्नी ५ वर्षीय मुलीला घेऊन हाजीपूरला निघून गेली. तिथे ती एका कंपनीत काम करू लागली. त्यावेळी एका महिलेसोबत ती ढोढी गावात गेली. काही दिवसांनी त्या गावच्या शेजारील चैनपूर भटौलिया गावातील हरेंद्र रायसोबत महिला राहू लागली.
महिलेनं कुणाला निवडलं?
महिलेचा पहिला पती राम प्रसादने पोलिसांना सांगितले की, मी सलग ७ वर्ष माझ्या पत्नीचा शोध घेत आहे. मागील मंगळवारी ती भटौलिया गावात असल्याचं मला कळालं. त्याची सूचना मी पोलिसांना दिली. त्यानंतर महिलेसह त्या व्यक्तीला घेऊन पोलीस ठाण्यात आला. यावेळी दोन्ही पुरुष महिलेला त्यांच्यासोबत घेऊन जाण्याची मागणी करत होते. तेव्हा महिला पहिल्या पतीसोबत जायला तयार झाली. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला तिच्या पहिल्या पतीसोबत पाठवलं.