शीख कैद्यांची सुटका आणि गुरुग्रंथ साहिबच्या विटंबनाप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलक घेराव घालण्यासाठी जमले होते. परंतू, या आंदोलकांकडे तलवारी, लाठ्या आदी हत्यारे होती. या आंदोलकांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत.
चंदीगढमध्ये आज हिंसक आंदोलन करण्यात आले. पोलिसांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली. तलवारीने हल्लेही झाले. अनेक पोलीस जखमी झाले आहेत. डीजीपींनी याचा ठपका क्वामी इन्साफ मोर्चावर ठेवला आहे. तसेच पंजाब पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
मोहालीच्या वायपीएस चौकाजवळ महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. कौमी इन्साफ मोर्चाच्या समर्थकांना त्यांच्या मागण्यांसाठी तीन दिवस पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जायचे होते. बुधवारीही काही लोकांच्या टोळक्याने चंदीगडमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा फवारा मारला. आंदोलकांनी बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांवर तलवारींनी हल्ले करत हिंसाचार केला.
पोलिसांनी लाठ्यांचा वापर केल्यावर आंदोलकांनीही त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावानेही तलवारी आणि लाठ्या काठ्या घेतल्या. दगडफेकही करण्यात आली. पोलिसांचे कडे तोडून आंदोलक चंदीगढच्या हद्दीत घुसण्यात यशस्वी झाले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्याही फोडल्या. GMSH-16 मध्ये सुमारे 15 पोलिसांना दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोन-तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.