मुंबई - चेंबूरमध्ये कुटुंबासोबत राहण्यास असलेल्या मायलेकीवर अनैतिक संबंधातून ३० वर्षीय राहुल निशाद याने वार केले. या हल्ल्यानंतर आरोपीने स्वत:ला संपविले आहे. या प्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
चेंबूर परिसरात ३५ वर्षीय तक्रारदार राहण्यास आहेत. त्यांचे राहुलशी अनैतिक संबंध होते. दोघांमध्ये झालेल्या वादातून राहुलने महिलेसह मुलीवर वार केले. कोरोना महामारीच्या काळात राहुल त्यांच्या घरी जेवायला येत होता. मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा रहिवासी असलेल्या राहुलचे मे महिन्यात गावी लग्न झाले. मात्र, लग्नानंतर तो एकटाच मुंबईला आला होता. गेल्या दोन महिन्यांपासून त्याने तक्रारदार यांच्या घरी जेवायला येणे बंद केले. बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास तक्रारदार आणि त्यांची मुलगी घरी असताना राहुल त्यांच्या घरी आला. त्याने महिलेवर वार केले.
मुलगी धावली मदतीसाठीमातेच्या मदतीसाठी मुलीने धाव घेताच, राहुलने तिच्यावरही वार केले. त्यानंतर दोघीनींही त्याच्या तावडीतून सुटका करत घराबाहेर धाव घेतली. दोघीही घराबाहेर पडल्यानंतर मात्र राहुलने स्वत:वरच वार करून घेतले. हल्ल्याच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. तक्रारदार यांनी येथील एक रिक्षा थांबवत मुलीसोबत राजावाडी रुग्णालय गाठले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर या दोघींना पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची वर्दी मिळताच नेहरुनगर पोलिसांनी घटनास्थळी आणि सायन रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी तक्रारदार यांचा जबाब नोंदवून घेत राहुलविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमी अवस्थेतील राहुलला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.