बिलासपूर - छत्तीसगडमधील बिलासपूर येथे झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. कारमध्ये बसलेल्या चार जणांपैकी तिघे एक मुलगी आणि दोन मुले काही क्षणातच जिवंत जळाले. शनिवारी रात्री रतनपूर-कोटा रोडवर असलेल्या चापोरा पेट्रोल पंपापासून १०० मीटर अंतरावर एक कार झाडावर आदळली, त्यानंतर त्यात भीषण आग लागली.
अपघातग्रस्त कारमधील लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि संपूर्ण कार जळून खाक झाली. ही घटना मध्यरात्री १.३० ते २.०० च्या दरम्यान घडली. मृतांमध्ये एका मुलीचाही समावेश असून दुसऱ्या मुलीचा शोध सुरू आहे. घटनास्थळी तीन जणांच्या मृतदेहाची ओळख पटली असून चौथ्या मुलीचा शोध सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बिलासपूरहून चौघेजण जांपी जलाशयाजवळील पचरा रिसोर्टला निघाले होते. तत्पूर्वी चौघांनी श्रीकांत वर्मा मार्गावरील एमीगोज बारमध्ये नशा केली होती. जवळपास १२ वाजता हे सर्व इथून निघाले. कार अपघातात केवळ ३ जणांच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यात २ मुले आणि एका मुलीच्या मृतदेहाचा समावेश आहे. तिघेही पूर्णपणे जळाले होते केवळ कवटीच्या आधारे ओळख पटवण्यात आली. कार आगीत राख बनली होती.
या दुर्घटनेत मृतांमध्ये समीर उर्फ शहनवाज, आशिका मनहर, अभिषेक कुर्रे यांचा समावेश आहे. चौथ्या मुलीचं नाव विक्टोरिया आहे. पोलीस विक्टोरियाचा शोध घेत आहेत. विक्टोरियाचा मोबाईल बंद आहे परंतु सायबर सेलकडून लोकेशन घटनास्थळाचं दाखवत आहे. कारमध्ये जळालेल्या अवस्थेत २ मृतदेह एकमेकांना चिकटले होते. त्यातील एक विक्टोरियाचा असू शकतो किंवा विक्टोरिया रस्त्यातच उतरली असावी असाही अंदाज लावला जात आहे.
शहनवाज हा राजकिशोर नगरचा राहणारा होता. मागील १० वर्षापासून बिलासपूरमध्ये राहून तो काम करायचा. अभिषेक कुर्रेसोबत तो रिंग रोड येथे राहायचा. अभिषेकच्या आई वडिलांचा आधीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आशिका मनगर ही कोरबाची राहणारी असून ती बिलासपूरमध्ये शिक्षण घेत आहे. घटनास्थळी पोलिसांना चैन, कडा सापडला त्याने समीरच्या मृतदेहाची ओळख पटली. गळ्यात चेनच्या आधारे आशिकाच्या मृतदेहाची ओळख पटली. तर अन्य सामानाच्या हवाल्याने अभिषेकला ओळखता आले. सर्वांची कवटी आणि हाडे वेगवेगळ्या ठिकाणी होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.