नवी दिल्ली - परीक्षेचा पेपर खराब गेल्यानंतर काही जण कुटुंबाशी खोटं बोलण्याचं नाटक करतात. परंतु दिल्लीत असा प्रकार समोर आलाय जिथं १० वीच्या युवतीनं परीक्षा खराब झाली म्हणून स्वत:च्या अपहरण आणि विनयभंगाची बनावट कहानी रचली. घरच्यांसोबत तिने पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु CCTV च्या मदतीनं पोलिसांनी तिने रचलेल्या बनावट कहानीचा पर्दाफाश केला.
ही घटना दिल्लीच्या भजनपुरा परिसरातील आहे. जिथे १५ मार्च रोजी शाळेत जाणाऱ्या १० वीच्या विद्यार्थिनीने स्वत:चं अपहरण आणि विनयभंग झाल्याचा आरोप केला. तिने आई वडिलांना सांगितले की, जेव्हा मी शाळेतून घरी परतत होते तेव्हा २-३ अज्ञात मुलांना रस्त्यातच मला रोखले. या तिघांनी मला निर्जनस्थळी नेले. तिथे गेल्यानंतर या मुलांनी माझी छेडछाड करत शारिरीक शोषण केले असं तिने म्हटलं.
घाबरलेल्या अवस्थेत आई वडिलांनी मुलीला सोबत नेत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. तिथे मुलीची मेडिकल चाचणी केल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या सदस्यांकडून तिचे समुपदेशनही करण्यात आले. मुलीच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. तपास पुढे गेला पोलिसांनी मुलीला घटनास्थळाबाबत विचारले. पीडिताने पोलिसांना जागा सांगितली. नेमकं त्याच ठिकाणी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरे लागल्याचं दिसून आले.
CCTV फुटेजची पडताळणीपोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली तेव्हा सर्वकाही उघडकीस आले. पोलिसांनी मुलीच्या सांगण्यावरून त्या दिवसाचे, वेळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु अशी कुठलीच घटना घडली नव्हती. त्यानंतर पुन्हा महिला आयोगाकडून मुलीचे काऊन्स्लिंग करण्यात आले. त्यावेळी मुलीने म्हटलं की, माझी १० वीची परीक्षा सुरू आहे. त्यात एका विषयाचा पेपर खराब गेला. त्यात निकाल अपेक्षित लागणार नाही आणि आई वडील नाराज होतील. त्यामुळे मी ही कहानी बनवली असा खुलासा तिने तपासात केला.