नवी दिल्ली - शहरातील एका स्विमिंग पूलमध्ये ११ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. २ पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीकडून या स्विमिंग पूलची देखभाल केली जात होती. मृत मुलाच्या कुटुंबाने स्विमिंग पूल संचालित करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत अलीपूर पोलीस ठाण्याबाहेर विरोध प्रदर्शन केले.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीच्या उत्तरेकडील अलीपूर भागात २ पोलीस अधिकारी पत्नी यांच्याकडून चालवण्यात येणाऱ्या स्विमिंग पूलमध्ये ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेबाबत गुन्हा दाखल केला असून याबाबत चौकशी सुरू आहे. माहितीनुसार, आतापर्यंतच्या चौकशीत कुठलाही संशय दिसत नाही, पण तपास सुरू आहे. या प्रकरणी कलम ३०४ ए अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यूचा गुन्हा दाखल आहे. ही घटना १४ मे रोजी घडली जेव्हा मुलगा त्यांच्या वडिलांसह स्विमिंग पूलमध्ये पोहायला आला होता.
घटनेच्या दिवशी वडिलांना आलेल्या एका इमरजेंसी कॉलवर ते बोलण्यासाठी बाहेर गेले. परंतु जेव्हा ते परतले तेव्हा त्यांचा मुलगा पाण्यात तरंगताना दिसला. तो बेशुद्ध अवस्थेत होता. मुलाला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला.
दरम्यान, मृत मुलाच्या कुटुंबाने अलीपूर पोलीस स्टेशनबाहेर विरोध प्रदर्शन केले. मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप कुटुंबाने केला. मात्र आतापर्यंतच्या तपासात कुठलाही संशय आढळत नाही. परंतु हा पूल अनधिकृतरित्या सुरू असल्याचं चौकशीत समोर आलं. इतकेच नाही तर हा पूल २ पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीकडून संचालित होत असल्याचंही उघड झालं. पोलीस या घटनेचा तपास करून जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करतील अशी माहिती डिसीपी यांनी दिली.