नवी दिल्ली - मथुरा इथं ट्रॉलीत सापडलेल्या मुलीच्या मृतदेहामुळे खळबळ माजली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला तेव्हा त्यातून ऑनर किलिंगचं प्रकरण उघड झालं आहे. दिल्लीतील बदरपूर परिसरात राहणाऱ्या व्यक्तीनं स्वत:च्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह लाल रंगाच्या बॅगेत भरून मथुराला फेकून दिले. वडिलानेच गोळी मारून आयुषी यादवची हत्या केल्याचं समोर आले आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, २२ वर्षाची आयुषी घरातून न सांगता बाहेर गेली होती. १७ नोव्हेंबरला जेव्हा ती घरी पोहचली तेव्हा वडील नितेश यादव यांनी तिला जाब विचारला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा संतापलेल्या वडिलांनी गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर रात्री वडिलांनी मुलीचा मृतदेह लाल रंगाच्या सुटकेसमध्ये भरून यमुना एक्सप्रेस वेच्या सर्व्हिस रोडवरील राया परिसरात फेकून दिला.
१८ नोव्हेंबरला दुपारी मथुरा पोलिसांना एका युवतीचा मृतदेह बेवारस अवस्थेत सापडल्याची माहिती मिळाली. या युवतीच्या डोक्यात, हाता-पायांवर जखमा होत्या. डाव्या छातीवर गोळी लागली होती. प्रकरणाचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी ८ टीम बनवल्या. त्यानंतर ४८ तासांत या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला अटक केली. या युवतीची ओळख पटवण्यासाठी तब्बल २० हजार मोबाईल कॉल्स ट्रेस केले. परिसरातील २१० सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत पडताळणी केली. तेव्हा अज्ञात मृतदेहाची ओळख पटली.
इतकेच नाही तर तपासावेळी यूपी पोलिसांनी दिल्ली-एनसीआर, हाथरस आणि अलिगडसह आसपासच्या परिसरात मृत युवतीचे पोस्टर चिपकवले होते. घटनेच्या तपासासाठी पोलिसांचे पथक गुरुग्राम, आग्रा, नोएडा, दिल्लीपर्यंत पोहचली. व्हॉट्सअप, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर केले. तेव्हा पोलिसांनी इनपुट हाती लागलं आणि संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.
हा मृतदेह आयुषी यादवचा असून तिचे वडील नितेश यादव आहेत असं समजलं. नितेश यादव हे कुटुंबासह नवी दिल्लीतील बदरपूर परिसरात राहतात. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. युवतीच्या आई आणि भावाला भेटले तेव्हा वडील बेपत्ता होते. त्यानंतर त्यांचा शोध घेतला. रात्रभर केलेल्या चौकशीनंतर वडिलांनी मुलीची हत्या केल्याचं कबूल केले. पोलिसांनी आरोपीकडून हत्यारासह मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी वापरण्यात आलेली कारही ताब्यात घेतली. आई आणि भावाला पोस्टमोर्टम गृहापर्यंत आणत मृत युवतीची ओळख पटवण्यात आली.
सध्या पोलीस आरोपी वडील नितेश यादवची चौकशी करत आहेत. सुरुवातीच्या तपासात केवळ आयुषी घरातून न सांगता बाहेर गेली होती. त्यामुळे जेव्हा ती परतली तेव्हा संतापाच्या भरात तिला गोळी मारल्याचं आरोपीने सांगितले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी लाल रंगाच्या बॅगेत भरून यमुना एक्सप्रेस हायवेवरील राया परिसरात फेकलं हे समोर आले. परंतु पोलीस आयुषीच्या हत्येचं संपूर्ण कारण जाणून घेत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"