धुळे - अवघ्या काही दिवसांवर लग्न असलेल्या उपवर तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सतीश बापू मिस्तरी (वय २२) या मुलाचा मृतदेह वडिलांनी पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. खुनाच्या या घटनेनंतर तर्कवितर्कांना उधाण आले होते. घटनेमागील नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही. दरम्यान या प्रकरणी मयताच्या चार मित्रांची चौकशी सुरू असल्याचे मोहाडी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांनी सांगितले.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोहाडी शिवारात असलेल्या मेहबुब सुबानी टेकडीच्या पुढे एका काटेरी झुडुपामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पथकाने धाव घेतली. दगडाने ठेचलेल्या आणि छिन्नविछिन्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात तरुण मृतावस्थेत पडून होता. त्याच्या हातावर सतीश असे नाव गोंदलेले दिसून आले आहे. बुधवारपासून मोहाडीतील तरुण बेपत्ता असून तशी प्राथमिक नोंद त्याच्या घरच्यांनी पोलिसांत केली होती.
त्यामुळे बेपत्ता असलेला तरुण हाच आहे का, अशी शक्यता गृहीत धरून त्याच्या पालकांना घटनास्थळी बोलाविण्यात आले होते. त्याच्या हातावर नाव गोंदलेले दिसून आल्यामुळे तरुणाची ओळख पटली. सतीश बापू मिस्तरी (वय २२, रा. मोहाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी बकरी चारायला आलेल्या इसमाला एका तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत दिसून आला. त्याने घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना कळविली. त्यानंतर तपासाअंती तरुणाची ओळख दुपारून पटली.
घटनास्थळी आढळल्या मद्याच्या बाटल्याघटनास्थळावरुन पोलिसांनी काही वस्तू जमा केलेल्या आहेत. त्यात बीयरच्या तीन बाटल्या, प्लॅस्टिकचे तीन ग्लास मिळून आले. याचा अर्थ सतीश याने आणखी दोन जणांसोबत पार्टी केल्याचा अंदाज आहे. तेथे झालेल्या काहीतरी वादावरुन त्याचा जीव कोणीतरी घेतला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पोलिस तपासानंतर नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल
वडील गहिवरलेतरुणाचे वडील बापू मिस्तरी यांनी तरुणाला पाहताच मोठ्याने हंबरडा फोडला. या वेळी त्याला पाहून अनेक जण गहिवरून आले. त्यांच्या प्राथमिक चौकशीतून बऱ्याच बाबी समोर आल्या.
सतीशचे ठरले होते लग्नमयत सतीश हा रिक्षा चालवित होता. त्याचे लग्नही ठरलेले होते. मात्र बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याचा खून झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.